झाडीपट्टी रंगभूमी : प्रमुख कंपन्यांना रसिकांकडून आमंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:24 AM2019-12-05T11:24:17+5:302019-12-05T11:24:36+5:30

झाडीपट्टी रंगभूमी यंदा विवंचनेत आहे. या रंगभूमीवर कार्यरत असलेल्या नाट्यनिर्मात्यांपुढे नाट्यप्रयोगांची संख्या घसरल्याचे संकट निर्माण झाले आहे.

Zadipatti Theater: Major companies have no invitation from spectators | झाडीपट्टी रंगभूमी : प्रमुख कंपन्यांना रसिकांकडून आमंत्रण नाही

झाडीपट्टी रंगभूमी : प्रमुख कंपन्यांना रसिकांकडून आमंत्रण नाही

Next
ठळक मुद्देस्टार कलावंतांच्या मानधनवाढीने निर्माते संकटात

प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झाडीपट्टी रंगभूमी यंदा विवंचनेत आहे. या रंगभूमीवर कार्यरत असलेल्या नाट्यनिर्मात्यांपुढे नाट्यप्रयोगांची संख्या घसरल्याचे संकट निर्माण झाले आहे. प्रयोगांची संख्या न वाढल्यास सीझनमधील आर्थिक गणितांचा पेच कसा सोडवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्टार कलावंतांनी मानधनात प्रचंड वाढ केल्याने, ही समस्या उपस्थित झाल्याचे बोलले जात आहे.
झाडीपट्टी रंगभूमीवर दिवाळीपासून पुढची चार महिने नाटकांचा सीझन चालतो. हजारो नाट्यप्रयोग दरवर्षी होत असतात. २०१८-१९ च्या सीझनमध्ये तब्बल तीन हजार नाट्यप्रयोग सादर झाले. यंदा मात्र अनेक कारणांनी नाट्यप्रयोगांची संख्या रोडावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सर्वात प्रमुख कारण म्हणून स्टार कलावंतांनी आपल्या मानधनात प्रचंड वाढ केली आहे. इथे खलनायकाची भूमिका पार पाडणारे कलावंत सुपरस्टार असतात आणि तेच सर्वाधिक मानधन घेत असतात. त्याखालोखाल किंवा तोडीचे मानधन महिला अभिनेत्रीला मिळत असते. त्यानंतरचे मानधन कॉमेडियनला मिळत असते. विशेष म्हणजे हे तीन पात्र इकडील रंगभूमीवर सादर होणाऱ्या प्रत्येक नाटकांचे प्रमुख पात्र असतात आणि त्यांच्यावरच रसिकांची गर्दी विसंबून असते. याच कलावंतांनी मानधनात कुठे दीडपट तर कुठे दुप्पट वाढ केल्याने, निर्मात्यांची पंचाईत झाली आहे. आतापर्यंत येथील काहीच स्टार कलावंत सहा ते आठ हजार रुपयापर्यंत नाईट घेत होते. यंदा नव्याने स्टार झालेल्या कलावंतांनीही आपले मानधन आठ ते दहा हजार रुपयापर्यंत वाढवले आहे. तर ज्यांच्या नावावरच रसिकांची गर्दी होते, अशा कलावंतांनी आपली नाईट १५ हजार रुपयांपर्यंत केली आहे. त्यामुळे निर्मात्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. स्टार नटांनी मानधनात वाढ केल्याने निर्मात्यांनीही प्रयोगांची किंमत वाढवली आहे. गेल्यावर्षीपर्यंत एक प्रयोग ४० ते ४५ हजार रुपयांत विकला जात असे. यंदा प्रयोग ५५ ते ६० हजार रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे नाट्यप्रयोग घेणाºया मंडळांनी नाटक न करण्याचा निर्णय घेतल्याने, निर्माते पेचात आहेत.

पोस्टरवर फक्त चेहरेच, बुकिंग नाही - प्रल्हाद मेश्राम
स्टार कलावंतांच्या चेहऱ्यावर नाट्यप्रयोगांना बुकिंग मिळण्याचा काळ ओसरल्याचे यंदाच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे. पोस्टरवरील चेहरे बघून यंदा बुकिंग होत नसल्याचे दिसून येते. प्रमुख कंपन्यांच्या नाट्यप्रयोगाची संख्या घसरलेली असेल, असे वाटत असल्याचे अखिल झाडीपट्टी विकास संस्था (महामंडळ) व अखिल झाडीपट्टी नाट्यनिर्माता संघटनेचे सचिव प्रल्हाद मेश्राम यांनी सांगितले.

स्थानिक कंपन्यांनी निर्माण केला पेच
झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांची प्रमुख बाजारपेठ म्हणून वडसा हे केंद्र सर्वपरिचित आहे. येथे ५५ कंपन्या आहेत. स्थानिकांच्याही १२ नव्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. सगळेच नवखे असल्याने जादा मानधनाचा विषय नाहीच आणि त्यामुळेच त्यांचे प्रयोग २८ ते ३५ हजारात स्थानिक मंडळांना उपलब्ध होत आहेत. या स्थानिक कंपन्यांनीच प्रस्थापित मंडळांपुढे पेच निर्माण केला आहे.

प्रयोगांची संख्या अर्ध्यावर
गेल्या वर्षी तीन हजार प्रयोग या झाडीपट्टीत झाले होते. ५५ प्रमुख कंपन्यांपैकी सहा कंपन्यांना १०० ते १३० प्रयोग, १२ कंपन्यांना ७० ते ९० प्रयोग, २० कंपन्यांना ४० ते ६० प्रयोग, सात कंपन्यांना ३० ते ३५ प्रयोग आणि १० कंपन्यांना १५ ते २५ असे कमी-जास्त प्रयोग मिळाले होते. यंदा मात्र या कंपन्यांकडून सादर होणाऱ्या नाटकांचे प्रयोग कुणाचे अर्ध्यावर तर कुणाचे दरवर्षीपेक्षा ३० टक्के प्रयोग घसरले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या १२ स्थानिक कंपन्यांनी घुसखोरी केली असून, साधारणत: ३०० ते ३५० प्रयोग आपल्या नावे केले आहेत.

Web Title: Zadipatti Theater: Major companies have no invitation from spectators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.