युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 22:01 IST2022-07-06T22:00:37+5:302022-07-06T22:01:20+5:30
Nagpur News राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान पडद्याआड असलेले युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी भेट
नागपूर : राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान पडद्याआड असलेले युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच नागपुरात आलेल्या फडणवीसांची सरदेसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईहून नागपुरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासमवेत अमृता फडणवीस व इतर नेतेदेखील होते. योगायोगाने त्याच विमानात वरुण सरदेसाई हेदेखील होते. नागपूर विमानतळावर उतरल्यावर वरुण सरदेसाई यांनी फडणवीस यांची विमानतळाच्या ‘लाऊंज’मध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी हस्तांदोलन करत फडणवीस यांना शुभेच्छादेखील दिल्या. फडणवीस यांनीदेखील मनमोकळेपणाने त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
एरवी वरुण सरदेसाई हे ‘सोशल मीडिया’वरदेखील सक्रिय असतात. याशिवाय शिवसेनेच्या समर्थनार्थदेखील त्यांची वक्तव्ये येत असतात. मात्र, १५ जूननंतर सरदेसाई यांनी एकही पोस्ट केली नाही. मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसंदर्भात सरदेसाई यांनी आढावा बैठक बोलविली होती. या बैठकीसाठी ते फडणवीस ज्या विमानाने आले, त्यानेच नागपूरला आले. फडणवीस या विमानात असतील याची त्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती, अशी माहिती युवा सेेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.