ंवायूसेनेचे १.९६ कोटी हडपणाऱ्या सूत्रधाराला जामीन
By Admin | Updated: August 5, 2015 02:53 IST2015-08-05T02:53:30+5:302015-08-05T02:53:30+5:30
दोन बनावट चेकचा वापर करून आरटीजीएसद्वारे वायूसेनेच्या एसबीआय बँकेतील खात्यातून १ कोटी ९६ लाख २९ हजार रुपये वटवून...

ंवायूसेनेचे १.९६ कोटी हडपणाऱ्या सूत्रधाराला जामीन
नागपूर : दोन बनावट चेकचा वापर करून आरटीजीएसद्वारे वायूसेनेच्या एसबीआय बँकेतील खात्यातून १ कोटी ९६ लाख २९ हजार रुपये वटवून हडपल्याप्रकरणी एका सूत्रधाराची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने जामिनावर सुटका केली. नीलेश ऊर्फ नीलू शिवरामसिंग ठाकूर (३०) असे आरोपीचे नाव असून, तो गिट्टीखदान पंचशीलनगर येथील रहिवासी आहे. नीलेश ठाकूर हा गुन्ह्याच्या वेळी एसबीआयच्या वायूसेना शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होता. वायूसेनेचे सहायक सुरक्षा अधिकारी सुनील गोपालकृष्ण पल्लीयाली यांनी वायूसेनेच्या खात्यातील ही रक्कम कुण्या अज्ञात आरोपीने काढल्याची तक्रार ३१ डिसेंबर २०१४ रोजी नोंदवताच गिट्टीखदान पोलिसांनी भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या तपासात चार जणांची नावे निष्पन्न होताच नीलेश ठाकूर, श्रवण कुशवाह, पवन कुशवाह आणि कामताप्रसाद कुशवाह, अशा चौघांना अटक केली होती. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीलेश ठाकूर याने एक वर्षापूर्वीच या घोटाळ्याचा कट रचला होता आणि आपल्या कटात इतर तिघांना सहभागी करून घेतले होते. प्रारंभी नीलेशने दोन बनावटी चेक तयार केले होते. कामताप्रसाद कुशवाह हा राजेंद्र शिवनाथ झा आहे, हे दाखविण्यासाठी त्याने बनावट पॅनकार्ड, व्होटर आयडी कार्ड, किरायापत्र, रहिवासी प्रमाणपत्र तयार केले होते. या आधारावर त्याने छावणीच्या एसबीआय बँकेत, मोहननगरच्या विजया बँकेत, बैरामजी टाऊनच्या इंडसइंड बँकेत, व्हीसीए ग्राऊंडस्थित बँक आॅफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बँकेत राजेंद्र शिवनाथ झा, झा ट्रेडर्स, राजेंद्र कन्स्ट्रक्शन्स, अशा वेगवेगळ्या नावांनी खाते उघडले होते. त्यावर छायाचित्रे कामताप्रसादची वापरली होती.
दोन्ही चेकवर श्रवण कुशवाह याने वायूसेनेच्या अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी केली होती. हे दोन्ही चेक वायूसेनेच्या एसबीआय बँकेत वटवून १ कोटी ९६ लाखांची रक्कम आरटीजीएसद्वारे विजया आणि इंडसइंड बँकेतील झाच्या बनावट खात्यात वळती केली होती. इंडसइंड बँकेतील खात्यात अचानक १४ लाख ५४ हजाराची रक्कम जमा झाल्याने बँक अधिकाऱ्यांना संशय येऊन त्यांनी ती रक्कम मूळ खात्यात परत पाठविली होती.
विजया बँकेतील खात्यात १ कोटी ८१ लाख ७५ हजार रुपये जमा झाले होते. या रकमेपैकी कामताप्रसाद कुशवाह याने १० लाख रुपये काढले होते. ८० लाख रुपये त्याने आरटीजीएसद्वारे गोधनी शाखेच्या आयडीबीआय बँकेत वळते केले होते. आयडीबीआयमधूनही त्याने १० लाख रुपये काढून ६० लाख रुपये इतवारी येथील पुरुषोत्तम कावळे यांच्या कुणाल ज्वेलर्सच्या बँक आॅफ इंडिया येथील खात्यात आरटीजीएसद्वारे वळते करून दोन किलो वजनाची सोन्याची बिस्किटे विकत घेतली होती. पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करून कटाचा पर्दाफाश केला होता. १ किलो ७५० ग्रॅम सोने, २० लाख २६ हजार रुपये रोख आणि इतर साहित्य जप्त केले. उर्वरित रक्कम पोलिसांनी संबंधित बँकांमध्ये गोठवून ठेवलेली आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार नीलेश ठाकूर याने जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. (प्रतिनिधी)