युग चांडक अपहरण हत्याप्रकरणी आरोप निश्चित
By Admin | Updated: December 24, 2014 00:45 IST2014-12-24T00:45:17+5:302014-12-24T00:45:17+5:30
लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठवर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले.

युग चांडक अपहरण हत्याप्रकरणी आरोप निश्चित
मुख्य आरोपीला मिळाला वकील
नागपूर : लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठवर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. लवकरच या खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ होण्याचे संकेत आहेत.
गत सुनावणीच्या वेळी मुख्य आरोपीच्यावतीने खटला लढणारे अॅड. अशोक भांगडे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता लिगल एडमार्फत अॅड. प्रदीप अग्रवाल यांना मुख्य आरोपीची बाजू मांडण्यासाठी नेमण्यात आलेले आहे.
या खटल्यात राजेश धनालाल दवारे (१९) रा. वांजरी ले-आऊट कळमना आणि अरविंद अभिलाष सिंग (२३) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका हे आरोपी आहेत.
१ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आरोपींनी १० कोटी रुपयाच्या खंडणीसाठी युगचे अपहरण केले होते. अपहरणाच्या दिवशीच दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात त्याचा खून केला होता, असा आरोपींविरुद्ध आरोप आहे. या खटल्यात १०० जणांना साक्षीदार करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी या खटल्याचा कार्यक्रम ठरणार आहे.
सरकार पक्षाच्या वकील ज्योती वजानी ह्या हा खटला चालविणार आहेत. फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांनी सरकार पक्षाला साहाय्य व्हावे म्हणून अॅड. राजेंद्र डागा यांना नेमले आहे. कुश कटारिया अपहरण-हत्याप्रकरणातही त्यांनी सरकारला साहाय्य केले होते. आरोपींच्यावतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. मनमोहन उपाध्याय आणि अॅड. प्रमोद उपाध्याय हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)