नागपूर : रविभवनातील एका बंगल्यात एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मात्र, रात्रीपर्यंत मृत तरुणाची ओळख पटविण्यात अंबाझरी पोलिसांना यश आले नव्हते.हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सध्या रविभवनातील सर्व बंगल्यांत रंगरंगोटी आणि नुतनीकरणाचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास रंग देणारे पेंटर बंगला नंबर ए-१ / २ मध्ये शिरले. येथे त्यांना एक तरुण गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. ही वार्ता रविभवन प्रशासनाला देण्यात आली. आत्महत्या करणारा तरुण तेथे काम करणारा असावा,असा संशय होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सर्व कंत्राटदारांना एकत्र बोलवले. मात्र, विविध प्रकारची काम घेणाऱ्या कोणत्याही कंत्राटदाराने त्याची ओळख पटविली नाही. त्यामुळे तो बाहेरचा तरुण असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला. दरम्यान, तो तरुण कोण, कुठला ते रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. रविभवनसारख्या संवेदनशील ठिकाणी हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अंबाझरी पोलिसांनी संकल्प निकोसे यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
रविभवनात तरुणाची आत्महत्या
By admin | Updated: November 18, 2015 03:19 IST