तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज

By Admin | Updated: July 21, 2014 00:56 IST2014-07-21T00:56:00+5:302014-07-21T00:56:00+5:30

सध्या देशात बरीच उलथापालथ सुरू आहे. वैचारिक आंदोलन पेटले आहे. परंतु या आंदोलनाबाबत सध्याचा तरुण अनभिज्ञ आहे. देशातील सर्व समस्यांचे समाधान हे आंबेडकरवादामध्ये आहे.

The youth need to say Ambedkarism | तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज

तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज

नागपूर : सध्या देशात बरीच उलथापालथ सुरू आहे. वैचारिक आंदोलन पेटले आहे. परंतु या आंदोलनाबाबत सध्याचा तरुण अनभिज्ञ आहे. देशातील सर्व समस्यांचे समाधान हे आंबेडकरवादामध्ये आहे. त्यामुळे आजच्या तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत आणि भीम पत्रिका जालंधर (पंजाब)चे संपादक एल.आर. बाली यांनी केले.
बाली यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी मंगल मंडप सभागृह कडबी चौक येथे नागपूरकरांतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समता सैनिक हरीश चहांदे होते. प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे,ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम, डॉ. कृष्णा कांबळे प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी एल.आर. बाली यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ‘आंबेडकरी आंदोलन के समतारत्न एल.आर. बाली’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा यावेळी बाली यांचा सत्कार केला.
गेल्या कित्येक वर्षानंतर नागपूरकरांशी संवाद साधताना बाली म्हणाले, नागपूर हे देशातील सर्व आंदोलनाचे केंद्र आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मप्रवर्तनासाठी नागपूर शहराची निवड केली होती. सध्या देशात उलथापालथ होत आहे. वैचारिक आंदोलन सुरू आहे. आंबेडकरी म्हणणे आणि आंबेडकरी होणे यात मोठी तफावत आहे, नैतिक असणे, तर्कशील असणे आणि मेहनती असणे खऱ्या बुद्धिवंतांचे लक्षण आहे, असे सांगत येत्या काळात देशात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. ती एक लढाई राहणार असून त्यासाठी आंबेडकरवाद्यांनी तयार राहण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. भाऊ लोखंडे यांनी संविधान टोपलीत टाकण्याची भाषा करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला.
समाज एकजूट राहिला तर कुणीही वाईट नजर टाकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. रणजित मेश्राम यांनी बाली यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. कृष्णा कांबळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत समता सैनिक दल मजबूत होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. सचिन कांबळे यांनी संचालन केले. प्रवीण मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

Web Title: The youth need to say Ambedkarism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.