तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

By Admin | Updated: August 10, 2016 02:31 IST2016-08-10T02:31:07+5:302016-08-10T02:31:07+5:30

मित्रांसह पोहायला गेलेल्या एका तरुणाचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. रोशन किशोर दायमा (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

The youth drowned in the lake and died | तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

तरुणाचा तलावात बुडून मृत्यू


दारूने केला घात : मित्रादेखत बुडाला

नागपूर : मित्रांसह पोहायला गेलेल्या एका तरुणाचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. रोशन किशोर दायमा (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सीताबर्डीत एका रेडिमेड स्टोअर्समध्ये सेल्समन म्हणून काम करीत होता.
हॉकर्सकडून व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी सीताबर्डी बाजारपेठ बंद होती. त्यामुळे बाजारपेठेतील विविध दुकानात काम करणारे अनेक तरुण इकडे तिकडे फिरायला गेले. रोशन आणि त्याचे मित्र गंगाधर यादव, प्रतीक निकोडे, निखील अशोक राव आणि रितेश लुधियानी हे सर्व अंबाझरी तलावावर गेले. तेथे अनेक तरुण-तरुणींचे घोळके होते. रोशनच्या मित्रांसह अनेकजण तलावात पोहत होते. दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास दारू पिल्यानंतर रोशन याने तलावात उडी घेतली. पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ते पाहून एका मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या रोशनने मित्रालाच घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मित्राने स्वत:ला वाचविण्यासाठी रोशनला झटकले. रोशनला वाचवावे म्हणून अन्य मित्र मदतीसाठी आरडाओरड करू लागले. परंतु फायदा झाला नाही. मित्रांच्या डोळ्यादेखतच रोशन पाण्यात बुडाला. हादरलेल्या मित्रांनी अंबाझरी ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. मात्र अंधारामुळे पोलिसांना रोशनला शोधण्यात यश आले नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा तलावात शोधकार्य सुरू झाले. त्यासाठी अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली. दुपारी २.३० च्या सुमारास सराईत पोहणाऱ्यांनी रोशनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. (प्रतिनिधी)

कुटुंबीयांवर आघात
रोशन सर्वसामान्य परिवारातील आहे. तो गांधीबागमध्ये राहत होता. त्याला वडील नाहीत. आई, दोन बहिणी आणि पत्नी तसेच एक नयन नामक मुलगी आहे. तो घरातील प्रमुख होता. तो तलावात बुडाल्याचे कळल्यानंतर त्याची आई आणि पत्नी यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. त्याचा मृतदेह तलावातून काढण्याचे काम सुरू असताना परिवारातील सदस्य, नातेवाईक अन् शेजारी तलावाच्या काठावर आक्रोश करीत होते. घरातील कर्ता गेल्यामुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या सोबतच्या मित्रांची अवस्थाही खराब झाली आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: The youth drowned in the lake and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.