Youth Congress vandalizes in the office of Opposition Leader Wanve in Nagpur NMC | नागपूर मनपा विरोधीपक्षनेते वनवे यांच्या कक्षात युवक काँग्रेसची तोडफोड
नागपूर मनपा विरोधीपक्षनेते वनवे यांच्या कक्षात युवक काँग्रेसची तोडफोड

ठळक मुद्देघेराव घालून नारेबाजी : विरोधीपक्षनेता निष्क्रीय असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस पक्षातील गटबाजी सर्वश्रृत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये एकजूट दिसून आली होती. पक्षात एकजूट अशीच कायम राहणार असे वाटत होते. मात्र सोमवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिकेतील विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या कक्षात घुसले. विरोधीपक्षनेता निष्क्रीय असल्याचा आरोप करीत त्यांना गोंधळ घातला. मुर्दाबादचे नारे देत खूर्च्यां फेकून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. वनवे यांची खूर्ची बळकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे कहीवेळ तनावाची स्थिती निर्माण झाली होती.


महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वनवे आपल्या कक्षात पक्षाच्या काही नगरसेवकांसोबत चर्चा करीत होते. त्यावेळी अचानक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार नारेबाजी करीत कक्षात घुसले. यात युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसिफ खान, बाबू खान, अक्षय घाटोळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. कक्षातील उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेले नगरसेवक बंटी शेळके यांनी प्रोत्साहन दिल्याने कार्यकर्त्यांनी वनवे यांना घेराव घातला.
काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनात वनवे यांचा सहभाग नसतो. हायटेन्शन लाईनच्या आंदोलनात वनवे आले नाही. लोकांच्या प्रश्नासाठी युवक काँग्रेसतर्फे महापालिकेवर मोर्चे काढून आंदोलन केले जाते. परंतु विरोधीपक्षनेते असूनही वनवे यांचा सहभाग नसतो. पक्ष बळकट व्हावा, यासाठी संजय महाकाळकर यांना हटवून वनवे यांना विरोधीपक्षनेता करण्यात आले. परंतु ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत करत नाही. त्यामुळे वनवे यांना या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा आरोप युवक काँग्रेसचे पूजक मदने यांनी केला.

वनवे यांची खूर्ची बळकावण्याचा प्रयत्न
विरोधीपक्षनेते झाल्यानंतर तानाजी वनवे एकदाही  देवडिया भवनाची पायरी चढले नाहीत.  त्यांनी काँग्रेसच्या संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला आहे. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनात वनवे यांचा सहभाग नसतो. त्यामुळे त्यांना पक्षाने दिलेल्या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. आजपासून युवक काँग्रेसच्या हलबा सेलचे राज बोकडे विरोधीपक्षनेते पद सांभाळतील अशी घोषणा करीत वनवे यांची खूर्ची बळकावण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित नगरसेविका आशा उईके यांनी कार्यक र्त्यांना रोखले. नगरसेवक किशोर जिचकार, माजी नगरसेवक मनोज साबळे यांनी कार्यक र्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र परत जाताना कार्यक र्त्यांनी नारेबाजी करीत खूर्च्यांची फेकाफेक केली. २० ते २५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता. 

पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार
युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांनी धुडघूस घालण्याचा प्रकार योग्य नाही. अशा घटनामुळे पक्ष कमकुवत होईल. यामागे बंटी शेळके यांचा हात आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार आहे. कार्यक र्त्यांचा आरोप चुकीचा आहे. मी दररोज कार्यालयात बसतो. आलेल्या तक्रारिंचा निपटारा करतो. लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. युवक काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप तानाजी वनवे यांनी केला. 

जोशी यांनी भेट दिली
तानाजी वनवे यांच्या कक्षात गोंधळ घातल्याची माहिती मिळताच महापालिकेतील सत्तापक्षनेते व महापौरपदाचे उमेदवार संदीप जोशी यांनी वनवे यांच्या कक्षाला भेट दिली. त्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त क रून  वनवे यांना धीर दिला. यावेळी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे उपस्थित होते. महापालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षक तैनात आहेत. परंतु या गोंधळाच्या घटनेमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Web Title: Youth Congress vandalizes in the office of Opposition Leader Wanve in Nagpur NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.