युवक काँग्रेसने रोखली दिल्लीला जाणारी रेल्वे
By Admin | Updated: August 22, 2014 01:31 IST2014-08-22T01:31:44+5:302014-08-22T01:31:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे करून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २० मिनिटे मंगळवारी रेल्वे क्रॉसिंगजवळ दिल्लीला जाणारी रेल्वेगाडी

युवक काँग्रेसने रोखली दिल्लीला जाणारी रेल्वे
विदर्भाची मागणी रेटली : २० मिनिटे केली जोरदार नारेबाजी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे करून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २० मिनिटे मंगळवारी रेल्वे क्रॉसिंगजवळ दिल्लीला जाणारी रेल्वेगाडी रोखून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी रेटून धरली.
मंगळवारी रेल्वे क्रॉसिंगजवळ दुपारी ४ वाजता रामटेक लोकसभा युवक काँग्रेस महासचिव शहबाज सिद्दीकी, फिरोज बुवा, नदीम मलिक, सलीम खान, नदीम जमा, अमित पाठक, आलोक पुंडपवार, शेख शफीक, वसीम खान आणि ३५ विदर्भवाद्यांनी दिल्लीला जाणारी रेल्वेगाडी रोखून धरली. रेल्वेगाडी थांबविल्यानंतर या गाडीच्या इंजिनपुढे उभे राहून या पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे बॅनर हातात घेऊन नारेबाजी सुरू केली. जवळपास २० मिनिटे ही नारेबाजी सुरू होती. रेल्वेगाडी थांबल्यानंतर गाडीतील प्रवासी खाली उतरले आणि त्यांनीसुद्धा वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देऊन वेगळ्या विदर्भाला आपले समर्थन जाहीर केले. गाडीचा लोकोपायलटही खाली उतरला आणि त्याने आंदोलनकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)
सुरक्षा यंत्रणा, रेल्वे प्रशासन गाफील
रेल्वेगाडी रोखून धरण्याच्या घटनेबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त इब्राहिम शरीफ यांना विचारणा केली असता याबाबत नियंत्रण कक्षातून कुठलाच निरोप आला नसून, घटनास्थळी एका निरीक्षकाला पाठविल्याची माहिती दिली. रेल्वेगाडी रोखून धरली असेल तर संबंधितांची माहिती घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनीसुद्धा अशी कुठलीच घटना घडल्याची माहीत नसल्याचे सांगितले. यावरून रेल्वेची सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन किती गाफील आहे, याचीच प्रचिती आली.