युवक कॉंग्रेसचे सरसंघचालकांविरोधात आंदोलन, देवडिया भवनाजवळ राडा

By योगेश पांडे | Updated: January 19, 2025 21:08 IST2025-01-19T21:08:24+5:302025-01-19T21:08:55+5:30

विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

Youth Congress protests against Sarsanghchalak, protest near Devdiya Bhavan nagpur | युवक कॉंग्रेसचे सरसंघचालकांविरोधात आंदोलन, देवडिया भवनाजवळ राडा

युवक कॉंग्रेसचे सरसंघचालकांविरोधात आंदोलन, देवडिया भवनाजवळ राडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी इंदूर येथे केलेल्या एका वक्तव्याचा विरोध करत युवक कॉंग्रेसकडून देवडिया भवनासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्ते संघ मुख्यालयाकडे निघण्याच्या तयारीत असतानाच विनापरवानगी आंदोलन केल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस-कार्यकर्त्यांची झटापट झाली व काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.

राम मंदिर बनल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळाले असे वक्तव्य सरसंघचालकांनी काही दिवसांअगोदर केले होते. त्यावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी टीकादेखील केली होती. नेमके रविवारी नागपुरात युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा हे नागपुरात होते. देवडिया भवनात झालेल्या बैठकीनंतर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतदेखील उपस्थित होते. युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले व आंदोलन करत संघाच्या गणवेशातील खाकी पॅंट जाळली. तसेच संघावर बंदी आणावी अशा मागणीचे फलक दाखवत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संघ मुख्यालयासमोर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

विनापरवानगी आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी निदर्शनास आणून दिले. मात्र कार्यकर्ते ऐकत नसल्याने थोडा वेळ पोलीस व कार्यकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरच रोखून धरले होते. अखेर आंदोलक ऐकत नसल्यामुळे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकारामुळे देवडिया भवन ते चिटणीस पार्क चौकात तणाव निर्माण झाला होता. तसेच वाहतूकीची कोंडीदेखील झाली होती. सायंकाळनंतरदेखील चिटणीस पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता.

Web Title: Youth Congress protests against Sarsanghchalak, protest near Devdiya Bhavan nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.