डिझेल दरवाढीने ‘आपली बस’ अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:31+5:302021-07-19T04:06:31+5:30
गणेश हूड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘आपली बस’ पूर्ण क्षमतेने चालविल्यास महापालिकेला दर महिन्याला ६ कोटीचा तोटा सहन ...

डिझेल दरवाढीने ‘आपली बस’ अडचणीत
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आपली बस’ पूर्ण क्षमतेने चालविल्यास महापालिकेला दर महिन्याला ६ कोटीचा तोटा सहन करावा लागतो. त्यातच आता इंधनाच्या किमतीतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्याचाही फटका बससेवेला बसला आहे. प्रतिकिलोमीटर खर्चात वाढ झाल्याने एका बसमागे दररोज २०० रुपये खर्च वाढल्याने आपली बसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आधी डिझेलचा खर्च हा ६० रुपये प्रति किलोमीटर इतका होता. तोच आता ६२ रुपये प्रति किलोमीटर झाला आहे. म्हणजेच प्रति किलोमीटर दोन रुपये वाढ झाली आहे. महापालिकेला दरवर्षी ८४ कोटींचा महसूल अपेक्षित असून १६५ कोटी इतका खर्च करावा लागत आहे. म्हणजेच वर्षाला ८१ कोटींचा तोटा सहन करावा लागतो.
४३८ आपली बस आहेत. या बसेस ८० मार्गावर धावल्यास दररोज १.५० लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु कोरोना संकटामुळे वर्षभरापासून आपली बस पूर्ण क्षमतेने चालविली जात नाही. सध्या २०० बस धावत आहेत. त्यात उभ्याने प्रवास करण्याला निर्बंध आहे. यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. नागपुरात कोरोना संक्रमण नगण्य असल्याने व जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. पेट्रोल शंभरी पार तर डिझेल त्याच्या जवळपास गेले आहे. याचा परिणाम आपली बसवर झाला असून दिवसाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.
कोरोना संकटामुळे पूर्ण क्षमतेने बस चालविली जात नाही. प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. पर्रतु जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने व तिसरी लाट न आल्यास पूर्ण क्षमतेने बस सेवा चालवावी लागणार आहे.
मागील वर्षी मनपाच्या अर्थसंकल्पात आपली बस साठी १०८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून सप्टेंबरपर्यंत बस सेवा ठप्प असल्याने खर्च ७० कोटीहून अधिक झाला नाही. २०२१ मध्ये अशीच परिस्थिती आहे.
...
३.१३ कोटींनी खर्च वाढणार
डिझेल दरवाढीमुळे दररोज एका बसचा खर्च २०० रुपयांनी वाढला आहे. पूर्ण क्षमतेने परिवहन सेवा सुरू झाल्यास दररोज ४३८ बस शहरात धावतील.याचा विचार करता मनपाला वर्षाला ३ कोटी १३ लाख ९२ हजार जादाचा खर्च करावा लागणार आहे.
...
अतिरिक्त आर्थिक बोजा
कोरोनाकाळापूर्वी दररोज ४३८ बस धावत होत्या. १.५० लाख प्रवासी प्रवास करीत होते. सध्या २०० बस धावत आहे. डिझेल दरवाढीमुळे प्रत्येक बस मागे दररोजचा खर्च २०० रुपयांनी वाढला आहे. डिझेल दरवाढीमुळे बसवर अतिरिक्त आथिंक बोजा वाढणार आहे.
रवींद्र पागे, परिवहन अधिकारी