आपली बस रस्त्यावर पडली बंद ; प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:51+5:302021-01-02T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या आपली बसची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

आपली बस रस्त्यावर पडली बंद ; प्रवासी त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आपली बसची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास अमरावती मार्गावर आपली बस अचानक बंद पडली. यामुळे बसमधील ३० प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सुदैवाने या मार्गावर धावणाऱ्या बसेस असल्याने दुसऱ्या बसमधून प्रवाशांना जाता आले.
बर्डी ते डिफेन्स दरम्यान धावणारी एमएच ३१-सीए ६२४४ क्रमांकाची शहर बस बोले पेट्रोलपंप चौकातून निघाली. परंतु लॉ -कॉलेज चौकात जाण्यापूर्वीच बंद पडली. बसमधील ३० प्रवाशांना खाली उतरावे लागले. या सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागली. १५ते २० मिनिटांनी एमएच-३१ सीए ६०२५ क्रमांकाची शहर बस आली. प्रवाशांनी बसला हात दिला. बस थांबली व त्यात प्रवासी बसले.
.........
धक्का मारावा लागला
प्रवासी दुसऱ्या बसमधून निघून गेल्यानंतर बंद पडलेल्या बसचा चालक, वाहक व मेकॅनिक यांनी बसला सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती सुरू न झाल्याने बसला धक्का मारून बस सुरू करावी लागली. यासाठी नागरिकांची मदत घेतली.
....
बस बंद पडण्याचे प्रकार वाढले
शहरातील विविध मार्गावर धावणारी आपली बसची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने बंद पडण्याचे प्रकार वाढले आहे. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत. तसेच काही भंगार बस चालविल्या जात असल्याने प्रवासी त्रस्त आहे. परिवहन सभापती व अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.