लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा / पारशिवनी: वडिलांशी झालेल्या भांडणातून धाकट्या भावाने थोरल्याची डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून हत्या केली. ही घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेकोलिच्या सिंगोरी कोळसा खाणीच्या आवारात गुरुवारी (दि. २०) रात्री १०:०० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली असली तरी खाणीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अजिंक्य देवेंद्र ढोके (२१) असे मृताचे, तर अभिजीत देवेंद्र ढोके (१९) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दोघेही सिंगोरी, ता. पारशिवनी येथील रहिवासी आहेत. अजिंक्य सिंगोरी ओपन काष्ट कोल माइनच्या ट्यूब क्रेशर हाऊसमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा, तर अभिजीत खासगी कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होता. अजिंक्य गुरुवारी दुपारी कामावरून घरी आला आणि झोपी गेला. त्याला रात्री परत कामावर जायचे होते. त्याच्या सावत्र आईची प्रकृती ठीक नसल्याने तिने स्वयंपाक केला नव्हता. याच कारणावरून वडील देवेंद्र यांच्याशी अजिंक्यचे भांडण झाले. त्यातच रागाच्या भरात तो कामावर निघून गेला. जाताना तो त्याचा सावत्र मामा कृष्णा रांगणकर यांच्या किराणा दुकानात गेला.
दुकान बंद असल्याने त्याने आजीला चिवडा विकत मागितला. आजीने त्याला डब्यातून खिचडी व चिवडा बांधून दिला. दरम्यान, अभिजीत नवीन बिना भानेगाव येथील आठवडी बाजारातून घरी परत आला. देवेंद्र यांनी अजिंक्यसोबत भांडण झाल्याचे त्याला सांगितले. त्याने अजिंक्यच्या फोनवर कॉल केले. त्याने प्रतिसाद न दिल्याने तो रात्री खाणीच्या आवारातील ट्यूब क्रेशर हाऊसमध्ये गेला.
अजिंक्य होता वाणिज्य शाखेचा विद्यार्थीअजिंक्य वेकोलि कामगार म्हणून काम करीत असला तरी तो वाणिज्य शाखेतील पदवीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांकडे ११ एकर शेती आहे. आईचे आधीच निधन झाल्याने वडिलांनी दुसरे लग्न केले. वडिलांचे दोन्ही मुलांशी फारसे पटत नव्हते. अलीकडे त्यांनी घरचा संपूर्ण व्यवहार अभिजीतकडे सोपविला होता.
आरोपीनेच दिली पोलिसांना माहिती
- आरोपी अभिजीत घटनास्थळाहून थेट घरी पळत आला. काही वेळाने त्याने पारशिवनी पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला घरून ताब्यात घेतले. शिवाय, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पंचनामा केला.
- अजिंक्यचा मृतदेह हॉस्पिटलमधून ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
खाणीची सुरक्षा वाऱ्यावर?खाणीतील ट्यूब क्रेशर हाऊसचे कंत्राट गुजरातच्या क्रिष्णा लिमिटेड या कंपनीला दिले आहे. सुबोध रवानी यांना कामगार पुरविण्याचे कंत्राट दिले होते. त्यांचा कंत्राट कालावधी दोन महिन्यांपूर्वी संपला. परंतु, वेकोलि अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी काम सुरूच ठेवले. त्यामुळे कंत्राटी कामगार कमी करणे अपेक्षित असताना ते करण्यात आले नाहीत.
प्रशासनाने कामगारांसह इतरांसाठी गेटपासदेखील तयार केले नाहीत. त्यामुळे अभिजीत खाणीच्या आवारात सहज शिरला आणि त्याने अजिंक्यची हत्या केली. येथील सुरक्षा व्यवस्था सशक्त असती तर ही घटना घडली नसती.
तिथे अजिंक्य जेवण करून आराम करीत बसला असताना काही कळण्याच्या आत अभिजीतने त्याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जोरात वार केले आणि पळून गेला. कामगारांनी अजिंक्यला लगेच वेकोलिच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.