ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:55+5:302021-07-07T04:09:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : भरधाव ट्रकने राेडच्या कडेने पायी जाणाऱ्या तरुणीला जाेरात धडक देत उडविले. त्यात गंभीर दुखापत ...

ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : भरधाव ट्रकने राेडच्या कडेने पायी जाणाऱ्या तरुणीला जाेरात धडक देत उडविले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी-आजनी मार्गावर साेमवारी (दि. ५) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
स्वीटी रमेशलाल चमेले (२४, रा. आजनी, ता. कामठी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती उप्पलवाडी, नागपूर येथील एका गारमेंट कंपनीत नाेकरी करायची. बरं वाटत नसल्याने ती दुपारी २ वाजताच्या सुमारास सुटी घेऊन कामठीला आली. आजनीला जाण्यासाठी कोणतेही वाहन न मिळाल्याने ती ३ वाजताच्या सुमारास घराकडे पायी निघाली.
दरम्यान, ड्रॅगन पॅलेस टेम्पलजवळील भुयारी मार्गापासून आजनीकडे जात असताना मागून वेगात आलेल्या एमएच-४०/बीजी-३३७९ क्रमांकाच्या ट्रकने तिला जाेरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात हाेताच ट्रकचालक ट्रक साेडून पळून गेला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्वीटीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला व अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.