मतदानासाठी युवा प्रबोधन
By Admin | Updated: October 10, 2014 00:55 IST2014-10-10T00:55:34+5:302014-10-10T00:55:34+5:30
लोकशाहीत नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा पवित्र आणि अमूल्य आहे, त्याचा आवर्जून वापर करा, असे आवाहन करीत गुरुवारी हजारो विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी रॅली काढली.

मतदानासाठी युवा प्रबोधन
नागरिकांना आवाहन : विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
नागपूर : लोकशाहीत नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा पवित्र आणि अमूल्य आहे, त्याचा आवर्जून वापर करा, असे आवाहन करीत गुरुवारी हजारो विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी रॅली काढली.
जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदार जागृती अभियानासाठी नियुक्त ब्रॅन्ड अॅम्बेसेडर व आंतरराष्ट्रीय बॅडमिन्टनपटू अरुंधती पाणतावने आणि स्वीप निरीक्षक विजय कुमार यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके, उपजिल्हाधिकारी जे.बी. संगीतराव, कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊ दायदार, महापालिकेचे उपायुक्त प्रमोद भुसारी, नायब तहसीलदार उज्वला तेलमासरे उपस्थित होत्या. लोकशाहीत नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य असून त्याचा त्यांनी आवर्जून वापर करावा आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे,असे आवाहन अरुंधती पाणतावने हिने केले.
स्वत: मतदान करा आणि परिसरातील नागरिकांनाही सांगा तसेच युवकांनीही मतदान करून राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे स्वीप निरीक्षक विजय कुमार म्हणाले.
रॅलीत २२ महाविद्यालयातील पाच हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते. मतदानाचे महत्त्व सांगणारे फलक त्यांच्या हातात होते. वसंतराव नाईक समाज विज्ञान संस्थेपासून निघालेली रॅली व्हेरायटी चौक, महाराजबाग रोड, विद्यापीठ चौक, शासकीय मुद्रणालय या मार्गाने गेली. रिझर्व्ह बँक चौकात विसर्जित झाली.पर्यवेक्षकांची मतदारसंघांना भेट स्वीप निरीक्षक विजयकुमार यांनी नागपूर शहर तसेच ग्रामीण भागातील विविध भागांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला व त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. विजयकुमार यांनी पश्चिम, पूर्व, मध्य, उत्तर, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाला भेटी दिल्या. त्याच प्रमाणे हिंगणा मतदारसंघातील आडेगाव मतदान केंद्राला भेट दिली. बाजारगाव, कोंढाळी येथील मतदान केंद्राची पाहणी केली. सावनेर, कळमेश्वर तहसील कार्यालयात त्यांनी मतदार जागृती अभियानाचा आढावा घेतला. काटोल, नरखेड तालुक्यालाही त्यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)