नागपूरकर पीयूष फुलझेलेचे ‘युपीएससी’त यश
By Admin | Updated: July 6, 2015 02:56 IST2015-07-06T02:56:51+5:302015-07-06T02:56:51+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय सेवा परीक्षेत (यूपीएससी) नागपूरच्या पीयूष फुलझेले याने यश संपादन केले आहे.

नागपूरकर पीयूष फुलझेलेचे ‘युपीएससी’त यश
विदर्भातून पाचव्या क्रमांकावर : देशसेवेचा संकल्प
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय सेवा परीक्षेत (यूपीएससी) नागपूरच्या पीयूष फुलझेले याने यश संपादन केले आहे. त्याचा अखिल भारतीय स्तरावर ७९५ वा क्रमांक तर विदर्भातून चौथा क्रमांक आहे.
पश्चिम बंगाल येथील दुर्गापूर एनआयटी येथून ‘बी.टेक.’ची पदवी मिळविल्यानंतर त्याने बंगळुरू येथे २ वर्षे नोकरी केली. परंतु लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्न होते व त्यामुळे त्याला नोकरीत समाधान मिळत नव्हते. अखेर नोकरीवर पाणी सोडून त्याने पूर्णवेळ केवळ ‘युपीएससी’च्या तयारीवर आपले लक्ष केंद्रित केले. पहिल्या दोन प्रयत्नांत त्याला यश आले नाही. परंतु पीयूषने जिद्द सोडली नाही. नवी दिल्ली व पुणे येथील विविध संस्थांमधून मार्गदर्शन घेतले. अखेर यंदा त्याला यश आले.
केवळ पद, प्रतिष्ठा यांच्यासाठी मला ‘युपीएससी’ची परीक्षा द्यायची नव्हतीच. या माध्यमातून खऱ्या अर्थाने देशसेवा करण्याची संधी मिळते. माझा ओढा हा ‘आयपीएस’कडे अधिक आहे. देशाची सुरक्षाव्यवस्था हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. माझा एक भाऊ ‘आयपीएस’ अधिकारी आहे. त्याने मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिवाय माझे आईवडील, शिक्षक व मित्र यांनी मौलिक सहकार्य केले. विशेष म्हणजे मला नेहमी प्रोत्साहन देऊन माझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत केली असे मत पीयूष फुलझेने याने व्यक्त केले.(प्रतिनिधी)