कार्यविस्तारासाठी संघाचा ‘योग’
By Admin | Updated: March 23, 2015 02:16 IST2015-03-23T02:16:23+5:302015-03-23T02:16:23+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील साडेसहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु अनेक ठिकाणी बंद पडलेल्या शाखा हा संघाच्या चिंतेचा विषय आहे.

कार्यविस्तारासाठी संघाचा ‘योग’
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील साडेसहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु अनेक ठिकाणी बंद पडलेल्या शाखा हा संघाच्या चिंतेचा विषय आहे. २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून बंद पडलेल्या शाखांना पुनरुज्जीवित करण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी जनतेत जास्तीतजास्त प्रमाणात जाऊन योग दिवस व योग सप्ताहाचा प्रचार करण्याची योजना स्वयंसेवकांकडून तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपुरात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत योगविद्येचा प्रसार करण्यासंदर्भातला प्रस्ताव संमत करण्यात आला होता. केंद्र व राज्य शासनांनी याला शैक्षणिक अभ्यासक्रमांत स्थान द्यावे, अशी सूचनादेखील या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्यात आली. योगविद्येचा प्रचार व प्रसार व्हावा ही संघाची यामागील भूमिका आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवसापूर्वी १४ ते २० जून हा आठवडा देशभरात योग सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान संघाच्या शाखांमध्ये तसेच संघपरिवारातील विविध संघटनांच्या वतीने योगविद्येच्या प्रसारासंदर्भात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरात संघाच्या शाखांमध्ये सुमारे १८ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी अनेक ठिकाणच्या शाखा बंद पडल्या आहेत.
या शाखांचे कार्य परत सुरू करण्यासाठी योग सप्ताहाचा उपयोग करण्याचा संघाचा मानस आहे. त्यादृष्टीने संबंधित शाखांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचून जास्तीतजास्त लोक परत कसे जुळतील यासाठी प्रयत्न करण्याची योजना असून, स्वयंसेवकांनी त्यादृष्टीने प्राथमिक काम सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)