यस्स ! व्ही आर द बेस्ट

By Admin | Updated: February 16, 2015 02:19 IST2015-02-16T02:19:46+5:302015-02-16T02:19:46+5:30

भारतीय संघाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सहाव्यांदा चारीमुंड्या चीत केले अन् उपराजधानीत रविवारी जल्लोषाला अक्षरश: उधाण आले.

Yes! Vr the best | यस्स ! व्ही आर द बेस्ट

यस्स ! व्ही आर द बेस्ट

नागपूर : भारतीय संघाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सहाव्यांदा चारीमुंड्या चीत केले अन् उपराजधानीत रविवारी जल्लोषाला अक्षरश: उधाण आले. आधीच रविवार अन् त्यात ‘हाय व्होल्टेज’ सामना असल्याने दिवसभर ज्या रस्त्यांवर शुकशुकाट होता, ते सर्व रस्ते सळसळत्या चैतन्याने वाहू लागले होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील प्रत्येक भागात अक्षरश: दिवाळी साजरी झाली. यंगिस्तानचा उत्साह तर ओसंडून वाहत होता अन् धरमपेठ, सदर, वर्धमान नगर, महाल, फुटाळा या परिसरात जोरदार जल्लोष झाला. ‘कमॉन इंडिया’, ‘भारत माता की जय’, ‘चक दे इंडिया’ या घोषणांनी हे परिसर दणाणून निघाले होते.
भारत-पाक सामना रविवारीच आल्याने शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणीच होती. एरवी सकाळी न उठणारे महाभागदेखील सर्व आवरून ७.३० पासूनच दूरचित्रवाणी संचासमोर बसले होते. सामना सुरू होण्याच्या अगोदर शहरातील काही मंदिरात चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात आली. धरमपेठेत तर विश्वचषकाच्या प्रतिकृतीची लहान मुलांनी आरतीदेखील केली. टीव्ही स्क्रीनला डोळे लावून बसलेले हजारो क्रिकेट रसिक विजयानंतर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर उतरले. घोषणा, ढोलताशांच्या गजरात नाच-गाणी अन् जोरदार आतषबाजी यामुळे संपूर्ण शहरात उत्साह दिसून आला. महाल-इतवारी परिसरात तर फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. शहरातील अ़नेक चौकांमध्ये मिठाई, साखर, लाडू वाटण्यात आले.
विश्वचषक जिंकल्याचा अनुभव
२ एप्रिल २०११ साली भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर उपराजधानीत ‘न भूतो न भविष्यति’ असे ‘सेलिब्रेशन’ झाले होते. त्यानंतर विश्वचषकातला रविवारचा पहिलाच सामना होता. पाकिस्तानवर विजय मिळवून ‘टीम इंडिया’ने विश्वचषक जिंकल्याचा आनंद दिला आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे ‘सेलिब्रेशन’देखील तसेच ‘रॉकिंग’ होते. लक्ष्मीभुवन चौकात तर उत्साहाला अक्षरश: उधाणच आले होते. कोणी पायी, कोणी दुचाकी तर कोणी कारमधून विजयाचा आनंद साजरा केला.

Web Title: Yes! Vr the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.