अंतर्गत मूल्यमापनाच्या फटक्यामुळे वर्ष वाया
By Admin | Updated: July 13, 2015 02:40 IST2015-07-13T02:40:17+5:302015-07-13T02:40:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित मोहता विज्ञान महाविद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या नियमांचा जोरदार फटका बसला आहे.

अंतर्गत मूल्यमापनाच्या फटक्यामुळे वर्ष वाया
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित मोहता विज्ञान महाविद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या नियमांचा जोरदार फटका बसला आहे. महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यमापनाचे शून्य गुण पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत विद्यापीठाने ‘अनुपस्थित’ दर्शविले. शिवाय नियमांनुसार या गुणांमध्ये बदल करता येणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणे हाच एक उपाय उरला आहे. यासंबंधात नेमकी चूक कुणाची असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
या महाविद्यालयातील विद्यार्थी बीएस्सीच्या गणित विषयाच्या तासांना अनुपस्थित राहिले. त्यामुळे संबंधित प्राध्यापकाने २०१३ च्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे शून्य गुण दिले. परंतु नियमांनुसार अंतर्गत मूल्यमापनाचे शून्य गुण गुणपत्रिकेत नोंदवण्याची तरतूद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुपस्थित असल्याचे दाखवण्यात आले. लेखी परीक्षेत जास्त गुण मिळविणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही व त्यामुळे ३३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. महाविद्यालयाने त्यानंतर झालेल्या सेमिस्टर परीक्षेत प्रथम सत्राचेदेखील अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठविले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात विचारणा केली असता विद्यापीठात गुण पाठविले असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. विद्यापीठ प्रशासनानेदेखील ही बाब गंभीरतेने घेतली नाही व विद्यार्थ्यांचा निकाल लवकरच लागेल असे कर्मचारी विद्यार्थ्यांना सांगत गेले.
परंतु दुसऱ्या सेमिस्टरचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली. त्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे परत पाठविलेले गुण स्वीकारण्यात आले नाही व प्रथम सेमिस्टर परत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना तिसऱ्या सेमिस्टरला प्रवेश नाकारण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. येवले यांच्याशी भेट घेतल्यानंतर नेमका गोंधळ लक्षात आला. अंतर्गत मूल्यांकनाच्या गुणांची फेरनोंद करताच येत नाही असे विद्यापीठाने स्पष्ट सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.(प्रतिनिधी)
नेमके जबाबदार कोण?
अंतर्गत मूल्यमापनाचे गुण परत पाठवता येत नाही असे महाविद्यालयाला कळविल्याचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट करत संबंधित प्राध्यापकाने शून्य गुण कसे दिले असा प्रश्न उपस्थित केला. विद्यापीठाची यात काहीच भूमिका नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. परंतु महाविद्यालयाने मात्र विद्यापीठाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यार्थ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने दुसऱ्यांदा गुण पाठवले होते. विद्यापीठाने ते गुण स्वीकार तर केलेच. शिवाय लवकरच निकाल लागेल असे आश्वासनदेखील विद्यार्थ्यांना तत्कालिन कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मग त्यावेळी नियम माहिती नव्हते का अशी विचारणा प्राचार्य डॉ.संजय चरलवार यांनी केली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या स्थितीला नेमके जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे.