यंदा फटाक्यांची ३० कोटींची उलाढाल!
By Admin | Updated: November 5, 2015 03:48 IST2015-11-05T03:48:42+5:302015-11-05T03:48:42+5:30
बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ

यंदा फटाक्यांची ३० कोटींची उलाढाल!
नागपूर : बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळी सात दिवसांवर आली असून सध्या फटाकेप्रेमींचा खरेदीचा जोर कमी असला तरीही शनिवारपासून विक्री वाढणार आहे. विक्रीचा तंतोतंत आकडा सांगणे कठीण आहे. पण नागपुरात फटाके बाजारात यंदा ३० कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याची माहिती होलसेल फटाके विक्रेते चांडक यांनी दिली.
आतषबाजीवर नियंत्रण येणार
४यंदा दिवाळीत महागाईमुळे नागरिकांना बजेट सांभाळत फटाक्यांची खरेदी आणि आतषबाजीवर नियंत्रण ठेवावे लागेल. फटाक्यांची बाजारपेठ ही केवळ १० दिवसांची असते. नागपुरात १० ते १२ होलसेल व्यापारी आणि हजाराच्या आसपास किरकोळ व्यापारी आहेत. शिल्लक असलेले फटाके त्यांना वर्षभर विकावे लागतात, अशी प्रतिक्रिया महाल येथील व्यावसायिक तन्वीर अहमद यांनी दिली. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आनंद लुटता यावा म्हणून यंदा बाजारात फटाक्यांचे अनेक प्रकार बाजारात आहेत. नागपुरात ९० टक्के फटाके तामिळनाडूच्या शिवाकाशी येथून येतात. रंग बदलणारे फुलपाखरू, मॅजिक व्हिप, सायरन कुंडी, गंगा जमुना, मेरी गो राऊंड, म्युझिकल एरियल, लाल रंगाच्या सुरसुऱ्या हे नवीन फटाके विक्रीसाठी आहेत. नागपुरात तयार होणाऱ्या मडक्यातील अनाराला जास्त मागणी आहे. त्याची पूर्वीच नोंदणी करावी लागते. मॅजिक व्हिप, सायरन कुंडी, बटरफ्लाय फटाक्यांना बच्चेकंपनीकडून मागणी असते. खास फटाक्यांमध्ये फुलझडी, तुकडा, डिलक्स चोरसा, सापगोळी, बॉम्ब, फ्लॉवर पॉट, धमाका, पेन्सिल, धुवा स्मोक आदी फटाके बाजारपेठेत विक्रीस आहेत.
प्रदूषणमुक्त फटाके
४यंदा बाजारात क्रेकडोवा, मॅजिक साप, मल्टीकट, आयटम, रंगीत फुलझडी व रंगीत फॅन्सी अनार इत्यादी नवीन प्रदूषणमुक्त फटाके बालकांकरिता उपलब्ध झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. यंदा प्रदूषणमुक्त फटाके बाजारात उपलब्ध झाल्याने बालकांचा आनंद द्विगुणित तर झालाच तसेच प्रदूषणमुक्त फटाके फोडल्याने वातावरणात प्रदूषण निर्माण होणार नाही आणि पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही, हे विशेष.
फटाक्यांना वर्षभर मागणी
४कोणत्याही समारंभात आतषबाजी करण्याची हौस सध्या वाढीस लागली आहे. सर्वांची खरेदी हजारात असते. काही जण आॅर्डर देऊन माल खरेदी करतात तर अनेक जण उपलब्ध फटाक्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याचे किरकोळ विक्रेते विलास समर्थ म्हणाले. वर्षभर होणारी फटाक्यांची उलाढाल कोटींच्या घरात असते.
रॉकेटला सर्वाधिक मागणी
४मोठ्या आवाजाच्या फटाक्यांसह आकाशात रंगबेरंगी प्रकाशाने उजाळा देणाऱ्या रॉकेटला सर्वाधिक मागणी असते. प्रति रॉकेट १० ते १५० रुपये दरात असून १० च्या पॅकमध्ये आहेत. यामुळे शरीराला इजा होत नाही. यासह अनार फटाका महिलांमध्ये प्रचलित आहे. आकाशात उडणाऱ्या रंगबेरंगी फवाऱ्याचा आनंद लहानांपासून वयस्कांपर्यंत लुटतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनारला जास्त मागणी राहील, असे विक्रेते श्रीकृष्ण गोयल यांनी सांगितले.