जुगार अड्ड्यावर धाड : दोन पोलिसासह चौघांना अटक
By Admin | Updated: April 7, 2017 23:23 IST2017-04-07T23:23:50+5:302017-04-07T23:23:50+5:30
पोलिसांकडून पोलिसांसाठी चालविण्यात येणा-या जुगार अड्डयावर गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी धाड घालून दोन

जुगार अड्ड्यावर धाड : दोन पोलिसासह चौघांना अटक
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ - पोलिसांकडून पोलिसांसाठी चालविण्यात येणा-या जुगार अड्डयावर गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी धाड घालून दोन पोलिसांसह चौघांना अटक केली. त्यांचे अर्धा डझनपेक्षा जास्त साथीदार पळून गेले.
पोलिसांच्या छाप्यात रंगेहात पकडण्यात आलेल्यांमध्ये पोलिस कर्मचारी किस्सू उर्फ सुरेंद्र रामदास तिवारी(अवस्थीनगर), श्यामसुंदर इंद्रभान मिश्रा (झिंगाबाई टाकळी), शिवशंकर नारायण शेट्टी (पोलिस लाईन टाकळी) आणि इसराईल इस्माईल पठाण (जाफरनगर) यांचा समावेश आहे. किस्सू तिवारी हा पोलीस खात्यात नेहमीच वादग्रस्त राहिला आहे.
पोलिस लाईन टाकळी परिसरातील पोलिस तलावाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू होता. त्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी शुक्रवारी दुपारी एक पोलीस पथक अड्डयावर पाठवले. मात्र, तेथे जुगार अड्डा सुरू नसल्याचे या पथकाने एसीपी वाघचौरे यांना कळविले. त्यानंतर पुन्हा दुपारी ४ च्या सुमारास गिट्टीखदानचे पोलीस पथक या अड्डयावर धडकले. पोलिसांना पाहून जुगारात बसलेल्या काही पोलिसांसह त्यांच्या मित्रांनीही धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करून चौघांना पकडले. हाती लागलेल्या जुगा-यात आपलेच भाउबंद असल्यामुळे कारवाईबाबत पोलीस संभ्रमात सापडले. त्यामुळे ही कारवाई उघड करावी की नाही, असा प्रश्न कारवाई करणारांना पडला. मात्र, वरिष्ठांनी रितसर कारवाईचे आदेश दिल्याने गिट्टीखदान ठाण्यात मुंबई जुगार कायदा १२ अन्वये गुन्हा नोंदवून जुगा-यांना अटक करण्यात आली.
दिव्याखाली अंधार
जुगाराचा हा अड्डा पोलिसांकडूनच पोलिसांसाठी आणि पोलीस मित्रांसाठी चालविण्यात येतो. पूर्वी हा अड्डा शहर नियंत्रण कक्षाच्या शेजारी चालायचा. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची नजर तिकडे वळल्याने हा अड्डा तेथून दुसºया एका ठिकाणी आता पोलीस तलावाजवळ भरविणे सुरू झाले. गावभरातील जुगार पकडण्यासाठी धावपळ करणाºया पोलीस कर्मचारी, अधिकाºयांचे बाजूलाच निवासस्थान आहे. त्यामुळे येथे २४ तास पोलिसांची वर्दळ असूनही या जुगार अड्ड्यावर पहिल्यांदा धाड घालण्यात आली हे विशेष!
दरम्यान, पोलिसांनी धाड घातल्यानंतर अनेक जुगारी पळून गेले. पकडण्यात आलेल्यांकडून ७२ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले. पळून गेलेल्या जुगाºयांनी लाखोंची रक्कम सोबत नेल्याचीही चर्चा आहे.