सिजोफ्रेनियाचा नव्हे मानसिक नैराश्यात होता याकूूब
By Admin | Updated: August 1, 2015 03:56 IST2015-08-01T03:56:08+5:302015-08-01T03:56:08+5:30
सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेमनची फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर फाशीच्या एक दिवसापूर्वीपर्यंत त्याच्या मन:स्थितीचे परीक्षण करण्यात आले होते.

सिजोफ्रेनियाचा नव्हे मानसिक नैराश्यात होता याकूूब
मुलीला घेऊन याकूब हळवा व्हायचा
सुमेध वाघमारे नागपूर
सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेमनची फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर फाशीच्या एक दिवसापूर्वीपर्यंत त्याच्या मन:स्थितीचे परीक्षण करण्यात आले होते. या कालावधीत त्याने कधीच मनातील घालमेल बोलून दाखविली नाही, किंवा चिडचिड केली नाही. मात्र, जेव्हा त्याला त्याची मुलगी जुबेदाविषयी विचारले जायचे, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी यायचे. डॉक्टरांच्या मते तो सिजोफ्रेनियाचा रुग्ण नव्हता, परंतु मानसिक नैराश्यात अडकला होता. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला १९९४ साली अटक केल्यानंतर त्याची रवानगी जेव्हा नागपूर कारागृहात करण्यात आली होती, तेव्हापासून मनोविकारतज्ज्ञाकडून त्याची नियमितपणे तपासणी व्हायची. दरम्यानच्या काळात मनोविकारतज्ज्ञ निवृत्त झाले. दीड महिन्यांपासून पुन्हा त्याची नियमितपणे मानसिक तपासणी सुरू झाली होती. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, याकूबला सिजोफ्रेनियाचा आजार नव्हता, परंतु फाशीच्या शिक्षेचे दडपण आणि एकटेपणामुळे तो मानसिक नैराश्यात अडकला होता.
त्याच्या डोळ्यात अश्रू होते
जुुबेदाविषयी बोलताच याकूबच्या डोळ्यात पाणी यायचे. एकदा एका डॉक्टराने जुबेदाविषयी विचारले असता, तो म्हणाला, मी जेव्हा भारतात आलो तेव्हा ती आपल्या आईच्या पोटात होती. नंतर काहीच बोलला नाही, त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. ‘अल्ला जो भी करेगा, अच्छा करेगा’ म्हणून त्याने तो विषय तिथेच थांबविला होता.