यादव कोहचाडेला चार वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:25 IST2017-07-20T01:25:19+5:302017-07-20T01:25:19+5:30
नागपूर विद्यापीठाच्या बहुचर्चित गुणवाढ घोटाळ्यात नाव येऊ न देण्यासाठी एका फौजदाराला सात लाख रुपयांची लाच देण्याचे प्रकरण सिद्ध झाल्याने,
यादव कोहचाडेला चार वर्षे कारावास
गुणवाढ घोटाळा : फौजदाराला
सात लाखांची लाच देण्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या बहुचर्चित गुणवाढ घोटाळ्यात नाव येऊ न देण्यासाठी एका फौजदाराला सात लाख रुपयांची लाच देण्याचे प्रकरण सिद्ध झाल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने नागपूर विद्यापीठाचा बडतर्फ सहायक कुलसचिव आरोपी यादव नत्थोबा कोहचाडे याला ४ वर्षे कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
१९९९-२००० मध्ये नागपूर विद्यापीठात गुणवाढ, पुनर्मूल्यांकन, बनावट गुणपत्रिका आणि बनावट डिग्रीचे प्रकरण गाजले होते. याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हेही दाखल करण्यात आले होते आणि अटकसत्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. या घोटाळ्याचा तपास सीताबर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अनिल लोखंडे हे करीत होते.
प्रत्यक्षात या घोटाळ्याचा सूत्रधार यादव कोहचाडे होता आणि तो हा घोटाळा आपला खास दलाल बंटी उके याच्यामार्फत करीत होता. या रॅकेटचा छडा फौजदार लोखंडे यांना लागला होता. त्यामुळे त्यांनी १८ जून १९९९ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास बंटीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याबाबत कोहचाडे याला समजताच त्याचे धाबे दणाणले होते. बंटी हा त्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. काही वेळानंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास यादव कोहचाडे याने फौजदार अनिल लोखंडे यांना फोन करून परस्पर भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. रहाटे कॉलनी चौकात भेटण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे कोहचाडे याने लोखंडे यांची भेट घेतली होती.
बंटी उके याला चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात येऊ नये, पुनर्मूल्यांकन आणि गुणवाढ प्रकरणात आपले नाव येऊ नये, विशालक्ष्मीचे नाव वगळले जावे, आदी महत्त्वाच्या मुद्यावर कोहचाडे याने लोखंडे यांच्याशी बोलणी करून सात लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. १९ जून १९९९ रोजी सीताबर्डी अभ्यंकर रोडवरील गणगौर रेस्टॉरंटमध्ये पैसे घेण्याचे
ठरले होते. तत्पूर्वी, अनिल लोखंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. ठरल्याप्रमाणे दुपारी २.२० वाजताच्या सुमारास यादव कोहचाडे हा सात लाखांची रक्कम घेऊन गणगौरमध्ये दाखल झाला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) पथकाने आधीच सापळा रचला होता. कोहचाडे हा ही रक्कम लोखंडे यांना देताच एसीबीच्या पथकाने कोहचाडे याला रंगेहात अटक केली होती. त्याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक पी.डी. गवई यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने पाच आणि बचाव पक्षाच्या वतीने तीन साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे यांनी काम पाहिले. २००० पासून हे प्रकरण न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी होते. प्रारंभी तत्कालीन जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आणि त्यानंतर तत्कालीन सहायक सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी हा खटला चालविला होता. आरोपीच्या वतीने अॅड. नायडू यांनी काम पाहिले.
कोहचाडेची
कारागृहात रवानगी
एवढ्या मोठ्या रकमेची लाच देण्याचे आणि एसीबीकडून कारवाई होण्याचे हे नागपूरच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण होते. कोहचाडे हा या प्रकरणात काही काळ कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी खटल्याचा निकाल सुनावला जाणार असल्याने कोहचाडे हा न्यायालयात उपस्थित होता. न्यायालयाने यादव कोहचाडे याला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावताच पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कारागृहाकडे रवानगी करण्यात आली. न्यायालयाने कोहचाडेला तीन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर तो कदाचित जामिनावर सुटला असता.