एक्स-रे नव्हे ‘मोबाईल-रे’

By admin | Published: September 8, 2015 04:53 AM2015-09-08T04:53:16+5:302015-09-08T04:53:16+5:30

रुग्णांचा एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या आजाराचे योग्य निदान एक्स-रे फिल्मच्या माध्यमातूनच होते. परंतु मध्य भारतातील

X-ray 'mobile-ray' | एक्स-रे नव्हे ‘मोबाईल-रे’

एक्स-रे नव्हे ‘मोबाईल-रे’

Next

सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
रुग्णांचा एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या आजाराचे योग्य निदान एक्स-रे फिल्मच्या माध्यमातूनच होते. परंतु मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलच्या डॉक्टरांनी ‘मोबाईल-रे’चे अजबच तंत्र शोधून काढले आहे. यामुळे रुग्णांचे निदान होणे तर दूर, मात्र जीवाला धोका होण्याची शक्यताच अधिक आहे. रुग्णाच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकाराकडे अधिष्ठात्यांपासून सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.
मेडिकलला एक्स-रे फिल्म पुरवठा करणाऱ्या कंपनीचे लाखांचे बिल थकले आहे. परिणामी, संबंधित कंपनीने फिल्म पुरवठा करण्यास नकार दिला आहे. यामुळे एक्स-रे, एमआरआय आणि सिटी स्कॅनसाठी दिवसभरात लागणाऱ्या ५००-६०० फिल्मच्याऐवजी मेडिकल प्रशासन स्थानिक पातळीवर सुमारे २०० फिल्म विकत घेत आहे. यामुळे गंभीर रुग्णांचेच या मशीनवर निदान करून फिल्म दिली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्याऐवजी मेडिकलच्या डॉक्टरांनी अजबच शक्कल लढविली आहे. फिल्म नसल्याने रुग्णालाच त्याचा ‘एक्स-रे’चा फोटो आपल्या मोबाईलमधून काढून आणण्यास सांगितले जात आहे.
असा आहे ‘मोबाईल-रे’
क्ष-किरण विभागात डिजिटल मशीनवरून ‘एक्स-रे’ काढला जातो. रुग्णाचा ‘एक्स-रे’ काढल्यानंतर तो संगणकावर दिसतो. फिल्मचा तुटवडा असल्याने संगणकावरील ‘एक्स-रे’चा फोटो रुग्णाला आपल्या मोबाईलमध्ये काढण्यास सांगितला जातो, नंतर हा मोबाईलचा फोटो संबंधित डॉक्टरांना दाखविला जातो. त्यावरून पुढील उपचाराची दिशा ठरविले जाते.
मोबाईल नाही तर एक्स-रे नाही
मेडिकलमध्ये ९० टक्के रुग्ण गरीब असतात. अनेकांकडे मोबाईल राहत नाही. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत, त्यात फोटो काढण्याची सोय नाही. काहींकडे मोबाईलमध्ये फोटो काढण्याची सोय असली तरी त्याचे चित्र स्पष्ट दिसेलच असे नाही. यामुळे गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. काही पदरमोड करून बाहेरून एक्स-रे करीत आहे तर काही नातेवाईकांचा, मित्रांचा अद्ययावत मोबाईल उधारीवर मागून काम भागवून घेत आहे.
अस्पष्ट फोटोवर कसे होणार निदान
रुग्णाचा एक्स-रे काढल्यानंतर त्याची फिल्म काढली जाते. त्यावर क्ष-किरण तज्ज्ञ डॉक्टर आपला अहवाल देतो. त्या अहवालावर संबंधित डॉक्टर आपल्या उपचाराची दिशा ठरवतो. परंतु संगणकावरील ‘एक्स-रे’चा मोबाईलमध्ये फोटो काढून त्यावरून निदान करीत असतील तर हा प्रकार धोकादायक आहे. मोबाईलच्या अस्पष्ट फोटोवर निदान करणे चुकीचे आहे, असे मेडिकलच्याच डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या धक्कादायक प्रकाराची चौकशी करणार
मेडिकलच्या क्ष-किरण विभागात ‘टेलि रेडिओलॉजी’ची सोय उपलब्ध आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे डॉक्टर आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून रुग्णाचा काढलेला एक्स-रे पाहू शकतात. याचा उपयोगही होत आहे. परंतु याला डावलत संगणकावरील एक्स-रेचा मोबाईलमध्ये फोटो काढून डॉक्टर जर निदान करीत असतील तर हा धक्कादायक प्रकार आहे. याची चौकशी केली जाईल.
- डॉ. किशोर टावरी
विभागप्रमुख, क्ष-किरण विभाग, मेडिकल

 

Web Title: X-ray 'mobile-ray'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.