१६ गुणांचा चुकीचा प्रश्न

By Admin | Updated: November 27, 2015 02:58 IST2015-11-27T02:58:48+5:302015-11-27T02:58:48+5:30

सुरुवातीला अगदी सुरळीतपणे सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये विविध अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

Wrong question of 16 marks | १६ गुणांचा चुकीचा प्रश्न

१६ गुणांचा चुकीचा प्रश्न

‘एमकॉम’च्या पेपरमधील प्रकार : विद्यार्थी चिंतातूर
नागपूर : सुरुवातीला अगदी सुरळीतपणे सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये विविध अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी झालेल्या ‘एमकॉम’च्या पेपरमध्ये १६ गुणांचा चुकीचा प्रश्न आल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. काही महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता विद्यापीठ यावर काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या चौथ्या टप्प्यास २४ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. यात प्रामुख्याने एमए, एमकॉम, बीए, बीएस्सी, बीकॉम अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता ‘एमकॉम’ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘अ‍ॅडव्हान्स फायनान्शियल अकाऊन्टिंग’ विषयाचा पेपर घेण्यात आला. या पेपरमधील ‘पार्ट बी’मध्ये पाचवा प्रश्न हा संभ्रम निर्माण करणारा होता. यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांना माहिती नसल्याने त्यांनी आहे तसाच पेपर सोडविण्याचे निर्देश दिले. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विषयतज्ज्ञांशी संपर्क साधला. यात हा प्रश्न चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांची कुठलीही अधिकृत तक्रार आली नसल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

काय आहे चूक?
विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार संबंधित प्रश्नात देण्यात आलेल्या रेकॉर्डमध्ये एकाच तारखेमध्ये दोनदा वेगवेगळ्या खरेदी रकमेचा समावेश करण्यात आला होता. प्रत्यक्षात ‘अकाऊन्टिंग’मध्ये असे होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. अनेकांनी उत्तरात दोन पैकी एक खरेदी रक्कम वापरून प्रश्न सोडविला.

Web Title: Wrong question of 16 marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.