शहांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला

By Admin | Updated: May 28, 2015 02:14 IST2015-05-28T02:14:40+5:302015-05-28T02:14:40+5:30

‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कोणाला दिला नव्हता’, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी करून वादळ उठवले असताना...

The wrong interpretation of the statements of the beads was misplaced | शहांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला

शहांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला

नागपूर : ‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कोणाला दिला नव्हता’, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी करून वादळ उठवले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे शहा यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. शहा यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असा दावा करीत वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर भाजपने माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही गडकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले.
नितीन गडकरी यांचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करणार नाही, असे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे अत्यंत साधेपणाने त्यांनी आपल्या महालातील निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. या वेळी पत्रकारांनी अमित शहा यांनी विदर्भाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता गडकरी म्हणाले, भाजपने सुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भाची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या भूवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीत तसा ठरावही संमत करण्यात आला होता. तो ठराव आजही कायम आहे. त्यामुळे भाजपने या मुद्यावर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहा यांच्या वक्तव्यामुळे विदर्भवाद्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली होती. भाजपविरोधी सूर आळवल्या जात होते.
अशात गडकरी यांनी शहा यांच्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे ‘डॅमेज कंट्रोल’चे काम केल्याचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)
मोदी, शहा ते मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
वाढदिवशी गडकरी नागपुरात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य व विदर्भातील नेत्यांनी गडकरी यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा आपल्याला भविष्यात समाजहिताची कामे करण्यासाठी बळ देतील, असे गडकरी म्हणाले.
अपंगासाठी हॉस्पिटल सुरू करणार
नागपूर येथे अपंगासाठी सर्वसुविधायुक्त एक हॉस्पीटल सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे गडकरी यांनी सांगितले. महापालिकेने यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर हे हॉस्पिटल उभारणे अधिक सोयीचे होईल, असेही ते म्हणाले. सायकल रिक्षा ओढणे हे मानवीय दृष्टीने अन्यायकारक वाटते. त्यामुळे पुढील वर्षभरात रिक्षाचालकांना स्वयंचलित रिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The wrong interpretation of the statements of the beads was misplaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.