लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जसजशा शरीरावर सुरकुत्या पडायला लागतात, तसतसा मनुष्य शोकांतात डुबत जातो. मात्र, कलाकाराचे तसे नसते. अरुण मोरघडे यांनी त्यांच्या शरीरावर पडलेल्या सुरकुत्यांना मनाच्या साम्राज्यात स्थान दिले नाही आणि म्हणूनच ते कलेच्या सिंहसनाचे सम्राट असल्याची भावना प्रसिद्ध कवी व लेखक बबन सराडकर यांनी व्यक्त केली.चित्रमहर्षी अरुण मोरघडे यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन्मानित करण्यासोबतच जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांना स्वतंत्र दालन उभारून देण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील कलावंतांनी एकत्र येऊन चित्रमहर्षी अरुण मोरघडे प्रतिष्ठानची स्थापना केली. मोरघडे प्रतिष्ठान व विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी अरुण मोरघडे यांचा अभिनंदन सोहळा श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात पार पडला. त्यावेळी बबन सराडकर यांनी त्यांच्याविषयीच्या भावना प्रकट केल्या. यावेळी कृषी संशोधक डॉ. शरद निंबाळकर, महाराष्ट्र आर्टिस्ट अकादमीचे अध्यक्ष प्रमोदबाबू रामटेके, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, मोरघडे गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर भेलकर, संयोजक चित्रकार प्रदीप पवार उपस्थित होते.मूल्यांशी तडजोड न करता, सृजनाचा झरा झुळझुळत ठेवणारे अरुण मोरघडे यांना अनेक सन्मान मिळाले असले तरी त्यांचे पाय अजूनही जमीनीवर आहेत. वयाच्या ९४ व्या वर्षीही त्यांची चित्रकला रंगत आहे. ते माणसांची पूजा करणारे व डळमळीत न होणारे सम्राट असल्याचे बबन सराडकर यावेळी म्हणाले. प्रास्ताविक प्रदीप पवार यांनी केले. संचालन वृषाली देशपांडे यांनी केले तर आभार सुभाष तुलसीता यांनी मानले.
सुरकुत्या मनावर पडू दिल्या नाहीत, असा हा चित्रसम्राट : बबन सराडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:27 IST
अरुण मोरघडे यांनी त्यांच्या शरीरावर पडलेल्या सुरकुत्यांना मनाच्या साम्राज्यात स्थान दिले नाही आणि म्हणूनच ते कलेच्या सिंहसनाचे सम्राट असल्याची भावना प्रसिद्ध कवी व लेखक बबन सराडकर यांनी व्यक्त केली.
सुरकुत्या मनावर पडू दिल्या नाहीत, असा हा चित्रसम्राट : बबन सराडकर
ठळक मुद्दे चित्रमहर्षी अरुण मोरघडे यांचा अभिनंदन सोहळा