बंदिवानांच्या दर्जेदार सादरीकरणाला रसिकांची दाद

By Admin | Updated: December 18, 2015 03:33 IST2015-12-18T03:33:46+5:302015-12-18T03:33:46+5:30

अतिशय आशयगर्भ आणि विचार करायला लावणारे प्रहसनात्मक लेखन असलेली संहिता, त्याचे बंदिवानांनी केलेले दमदार सादरीकरण, लोकनृत्य, लावणी...

Wreaths to the audience of the captives | बंदिवानांच्या दर्जेदार सादरीकरणाला रसिकांची दाद

बंदिवानांच्या दर्जेदार सादरीकरणाला रसिकांची दाद

संगीत, नृत्य, नकला आणि स्कीट : गृह विभागाचे आयोजन
नागपूर : अतिशय आशयगर्भ आणि विचार करायला लावणारे प्रहसनात्मक लेखन असलेली संहिता, त्याचे बंदिवानांनी केलेले दमदार सादरीकरण, लोकनृत्य, लावणी आणि महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या नृत्यमालिकेसह सुरेल गीतांचे गायन करून बंदिवानांनी आज उपस्थितांना जिंकले. प्रारंभी बंदिवानांकडून उपस्थितांना इतके व्यावसायिक स्तरावरचे दर्जेदार सादरीकरण अपेक्षित नव्हते. पण कार्यक्रम सुरू झाल्यावर बंदिवानांनी अभिनय, नृत्य आणि गायनाने उपस्थितांना दाद द्यायला भाग पाडले.
राज्याच्या गृह विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन नऊ वर्षानंतर नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. बंदिवांनाच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील गुन्हेगारीवृत्ती शमविण्यासाठी आणि चांगले नागरिक होण्याच्या परिवर्तनाला प्रारंभ करण्यासाठी या कार्यक्रमाला गृह विभागाच्यावतीने प्रारंभ करण्यात आला होता. गेली नऊ वर्षे काही तांत्रिक कारणाने हा कार्यक्रम होऊ शकला नाही; पण यंदापासून ‘बंदिवान रजनी’ला प्रारंभ करण्यात आला. अमरावती, येरवडा, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर येथील बंदिवानांचा या कार्यक्रमात सहभाग होता. सनईवादनाने आणि ‘देवा श्री गणेशा...’ गीतावरील नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कारागृहातील काही बंदिवान उच्चशिक्षित आहेत, त्यांना शिक्षणासाठी आणि कलावंत असणाऱ्यांना त्यांच्या कलेसाठी कारागृहाच्यावतीने प्रोत्साहन देण्यात येते. बंदिवानांनी या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिभेचा परिचय देत उत्कृष्ट नृत्य, नाट्य, गायन सादर करून उपस्थितांची दाद घेतली. बंदिवानांचे हे सादरीकरण व्यावसायिक कलावंतांसारखे असल्याने उपस्थितांनी त्यांना वन्समोअरचीही दाद दिली.
नाशिक आणि औरंगाबादच्या कलावंतांनी ‘जहां डाल डाल पर सोने की...’ आणि एक कव्वाली सादर करून रसिकांची दाद घेतली. तर कार्यक्रमात ठाकरं ठाकरं...गीतावर नृत्य, गांधींजींची भूमिका, कवितावाचन, कोळीगीत आदींचे सादरीकरण वेधक होते. यात एका बंदिवानाने अभिनेते निळू फुले ते नाना पाटेकरपर्यंतच्या आवाजात संवाद सादर करून वन्समोअर घेतला. खेळ मांडला आणि मिले सूर मेरा तुम्हारा...गीतावर कलात्मक नृत्याने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री राम शिंदे, गृह विभागाचे मुख्य सचिव के. पी. बक्षी, प्रधान सचिव सतबीरसिंग, कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

बंदिवानांच्या जीवनात प्रकाशपहाट होवो
कारागृहातील गैरप्रकार थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यातील महत्वाची उपाययोजना सीसीटीव्ही. ती अनेक कारागृहात लावण्यात आली असून आणखीही बरेच काही करायचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ३४ वर्षानंतर तयार करण्यात आलेल्या नवीन जेल मॅन्युअलचे विमोचनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. बंदिवानांच्या जीवनात प्रकाशपहाट होवो, अशी शुभेच्छा दिली. प्रारंभी डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी प्रास्ताविकातून कारागृहाचा इतिहास सांगताना भगवान कृष्ण यांचा जन्म आणि वासुदेव याची कथा तसेच आग्राच्या कारागृहातून शिवाजीमहाराज कसे सटकले याची उदाहरणे देत सर्वांची दाद दिली. आभार मानताना कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एकूणच व्यवस्थेचा धावता आढावा घेतला.
गायक कादरभाई आणि संजय पेंडसे यांचा सत्कार
सुपसिद्ध पार्श्वगायक एम. ए. कादर आणि नाट्य दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी बंदीवांनाना एक महिना प्रशिक्षण देऊन या सादरीकरणासाठी तयार केले. संगीत संयोजन कादरभाई यांचे तर इतर सांस्कृतिक नियोजन संजय पेंडसे यांनी पाहिले. बंदीवानांकडून उत्कृष्ट सादरीकरण करून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कादरभाई आणि पेंडसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title: Wreaths to the audience of the captives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.