घातक शस्त्रांचे घाव - सक्करदऱ्यात तिहेरी हत्याकांड

By Admin | Updated: April 10, 2015 02:06 IST2015-04-10T02:06:19+5:302015-04-10T02:06:19+5:30

पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

Wounds of hazardous weapons - Tiger massacre in solidarity | घातक शस्त्रांचे घाव - सक्करदऱ्यात तिहेरी हत्याकांड

घातक शस्त्रांचे घाव - सक्करदऱ्यात तिहेरी हत्याकांड

नागपूर : पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. नागरिकांनी आपापली दारे बंद करून घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडून असताना अवघ्या १०० मीटर अंतरावर उगले बंधूंच्या कुटुंबीयांना बराच वेळपर्यंत काहीही माहीत नव्हते. एकनाथचा भाचा पान सेंटरवर येत असताना त्याला संजय आणि केशवचे मृतदेह दिसले. त्यामुळे ओरडतच तो घरी गेला. वृद्ध आई आणि तिच्या तिन्ही सुना घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनाही कळविण्यात आले. माहिती कळताच सक्करदरा पोलीस पोहोचले. यावेळी एकनाथला धुगधुगी होती. त्याला एका वाहनात घालून मेडिकलला नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी एकनाथलाही मृत घोषित केले.
परिसरच नव्हे, पोलिसही हादरले
या तिहेरी हत्याकांडाने सक्करदरा, बिडीपेठ परिसरातील नागरिकच नव्हे तर पोलीस दलही हादरले. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर यांच्यापाठोपाठ पोलिसांचा मोठा ताफा आणि पोलीस आयुक्त के.के. पाठक तसेच सहआयुक्त अनुपकुमार सिंग हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीनंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. हे तिहेरी हत्याकांड गुन्हेगारांमधील उफाळलेल्या वादाचा परिणाम असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला. गुन्हेगारांमधील वैमनस्यावरून हे हत्याकांड घडल्याचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले. मात्र, हा टोळीयुद्धाचा प्रकार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
उगले परिवारात आक्रोश
एकनाथ, संजय आणि केशव हे तिघेही भाऊ एकत्र राहात होते. एकनाथ सर्वात मोठा असला तरी सर्वात आधी लग्न संजयचे झाले होते. त्यामुळे त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकनाथला एक मुलगा आहे तर, केशवची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. तिला कोणत्याही दिवशी मूल होऊ शकते. त्यामुळे उगले परिवारात नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी होती. मात्र, हे आक्रित घडले. तीनही भाऊ एकाच वेळी निर्घृणपणे मारले गेल्यामुळे तिघांच्या पत्नी तसेच वृद्ध आईचा आक्रोश पाहवला जात नव्हता. मुले मात्र अबोध असल्यामुळे ती हा आक्रोश गप्पपणे बघत होती. त्यांना या भयावह घटनेची कल्पनाच नव्हती. उगले परिवाराचा आक्रोश परिसराला हलवून सोडणारा होता.

Web Title: Wounds of hazardous weapons - Tiger massacre in solidarity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.