लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या गॅस बाजारपेठेत सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे गॅस एजन्सी आणि गोदामांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन आदेशानुसार आता दोन सिलिंडरच्या बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य केल्याने सामान्यांची मोठी धावपळ उडाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅसचा टपऱ्या व हॉटेल्समध्ये राजरोस वापर होत असल्यामुळे शहरात कृत्रिम गॅसटंचाई निर्माण झाली आहे. युद्धाच्या भीतीपोटी साठेबाजी की यंत्रणेचे अपयश ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
नागपुरातील मागणीचा आकडा थक्क करणारा
नागपुरात युद्धापूर्वी दररोज ३ हजार व्यावसायिक, २ हजार औद्योगिक आणि ३५ हजारांहून अधिक घरगुती गॅस सिलिंडरची विक्री व्हायची. सध्या पुरवठा साखळीत कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र, हॉटेल आणि टपऱ्यांवर होणारी गळती आणि ग्राहकांमध्ये पसरलेली भीती यामुळे गोदामांबाहेर गर्दी वाढत आहे.
सॉफ्टवेअरमधील बदलाचा फटका
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी बुकिंग सॉफ्टवेअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता ग्राहकाला दुसरे सिलिंडर हवे असल्यास पहिल्या बुकिंगनंतर २५ दिवस पूर्ण झाल्याशिवाय नवीन बुकिंग करता येत नाही. घरी भरलेले सिलिंडर असतानाही, पुढे गॅस मिळेल की नाही, या भीतीपोटी अनेक ग्राहक मुदत संपण्याआधीच बुकिंगसाठी धावपळ करत आहेत. मात्र, सॉफ्टवेअरमध्ये २५ दिवसांची मर्यादा असल्याने अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
व्यावसायिक वापर अन् घरगुती गॅसचा 'झोल', कारवाई कागदावरच
बाजारात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने अनेक रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या टपन्यांवर घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस वापरण्यावर बंदी घातली असली, तरी अनेक ठिकाणी ही कारवाई कागदावरच मर्यादित असल्याचे दिसते. व्यावसायिक गॅस महाग असल्याने हॉटेल चालक छुप्या मार्गाने घरगुती सिलिंडर मिळवत आहेत, परिणामी सर्वसामान्य घरगुती ग्राहकांसाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नागरिक व विविध संघटना करत आहेत.
प्रशासनाकडून तपासणीची मागणी
गॅस एजन्सींचे व्यवहार, वाटपाची पद्धत आणि विशेषतः हॉटेल्समध्ये होणारा घरगुती गॅसचा वापर यांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विविध सामाजिक संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊन रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या टपऱ्यांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. जर वेळीच कारवाई झाली नाही, तर सामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघरात भविष्यात मोठी टंचाई निर्माण होऊ शकते.
असे आहेत बुकिंगचे नियम
नियम असा: दोन सिलिंडरमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य., सॉफ्टवेअर बदल: मुदतीआधी बुकिंग स्वीकारले जाणार नाही, तपासणी: हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि टपऱ्यांवर घरगुती गॅस वापरल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी.
गॅस एजन्सींची तपासणी : नागपूर शहरातील तिन्ही सरकारी कंपन्यांचे ५२ वितरक आणि खासगी कंपन्यांचे २० हून अधिक वितरकांचे कार्यालय आणि गोडाऊनची युद्धस्तरावर तपासणी करण्याची नागरिक आणि विविध संघटनांची मागणी.
Web Summary : Nagpur faces a gas crisis due to rule changes and black market fears. Long queues form at gas agencies. Domestic gas is allegedly diverted to commercial use, causing shortages. Inspections are demanded to prevent further disruption.
Web Summary : नागपुर में नियमों में बदलाव और कालाबाजारी के डर से गैस संकट। गैस एजेंसियों पर लंबी कतारें। घरेलू गैस कथित तौर पर वाणिज्यिक उपयोग में परिवर्तित, जिससे कमी। आगे व्यवधान रोकने के लिए निरीक्षण की मांग।