पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !
By Admin | Updated: August 7, 2014 01:02 IST2014-08-07T01:02:45+5:302014-08-07T01:02:45+5:30
गीतरामायण हे केवळ रामाचे चरित्र नव्हे आणि केवळ काव्यही नव्हे. ते आपल्या संस्कृतीचे संचित आणि असामान्य शब्दांचे शिल्पच आहे. गदिमा अर्थात कवी माडगुळकर आणि त्यांच्या शब्दांना

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !
रंगली गीतरामायणाची सुरेल मैफिल : लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड प्रतिष्ठानचे आयोजन
नागपूर : गीतरामायण हे केवळ रामाचे चरित्र नव्हे आणि केवळ काव्यही नव्हे. ते आपल्या संस्कृतीचे संचित आणि असामान्य शब्दांचे शिल्पच आहे. गदिमा अर्थात कवी माडगुळकर आणि त्यांच्या शब्दांना तितक्याच अथप्रवाहीत्वाने संगीताच्या माध्यमातून भाविक रसिकांपर्यंत पोहोचविणारे संगीतकार सुधीर फडके उपाख्य बाबुजी. या दोन्ही दिग्गजांनी गीतरामायण घराघरात पोहोचविले. रामायण हा ग्रंथ अजरामर आहेच पण रामायणातील प्रसंगावर आधारित गीतरामायण हा प्रत्येक मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा आहे. हा ठेवा कितीही वेळा ऐकला तरी प्रत्येकवेळी त्याची मोहिनी वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला पडतेच. आज गीतरामायणाच्या सादरीकरणाने नागपूरकर श्रोते भक्तीरसात चिंब झाले.
लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आज गीतरामायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमत सखी मंचच्या सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांनी गीतरामायणाच्या श्रवणाचा आनंद घेतला. बाहेर पाऊस कोसळत होता पण गीतरामायण ऐकण्यासाठी श्रोते आवर्जून उपस्थित होते.
अविनाश घोंगे, गुणवंत घटवई आणि वर्षा बारई या गायकांनी रामायणातील गीते सादर करून उपस्थितांची दाद घेतली. अनेक गीतांना वन्समोअर देत उपस्थितांनी आपल्या दर्जेदार अभिरुचीचा परिचयही यावेळी दिला. प्रभा देऊसकर यांचे नेटके निवेदन आणि गीताच्या आधी त्या गीतांचे प्रसंग त्या सांगत असल्याने रसिकांना प्रत्येक गीताची पार्श्वभूमी नेमकेपणाने कळत होती.
त्यामुळे गीत ऐकताना रामायणातील अनेक प्रसंगांशी उपस्थित एकरूप झाले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ अविनाश घोंगे यांनी ‘कुश लव रामायण गाती’ या गीताने केला.
गुणवंत घटवई यांनी ‘दशरथा घे हे पायसदान’ आणि वर्षा बारई यांनी सादर केलेले ‘राम जन्मला ग सखे...राम जन्मला, सावळा ग रामचंद्र’ या गीतांनी प्रभु रामचंद्रांच्या भक्तीत श्रोते तल्लीन झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन कुसुमताई बोदड प्रतिष्ठानचे केशवराव बोदड, आरती बोदड, कल्पना भेंडे, गायक अविनाश घोंगे, गुणवंत घटवई आणि वर्षा बारई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी शशीकांत बोदड यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमात शिरीश भालेराव- व्हायोलिन, संदीप गुरमुळे - संवादिनी, मोरेश्वर दहासहस्र - तबला, चारुदत्त जिचकार - आॅक्टोपॅड आणि गोविंद गडीकर यांनी सिंथेसायझरवर साथसंगत केली. (प्रतिनिधी)