जागतिक रेबीज दिन :दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:02 PM2019-09-27T22:02:43+5:302019-09-27T22:05:58+5:30

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून देशात दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू होतो. यात १५ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वात जास्त आहे.

World Rabies Day: One person dies of rabies every 25 minutes | जागतिक रेबीज दिन :दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू

जागतिक रेबीज दिन :दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देभारतात दरवर्षी ३० हजार लोक मृत्यूच्या दारात : जीवघेण्या आजारावर जनजागृती आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्वानदंशामुळे ‘रेबीज’च्या ज्या केसेस भारतात आढळतात, त्यातील ९७ टक्के पिसाळलेल्या कुत्र्यापासून उद्भवलेल्या असतात. जगात दरवर्षी रेबीजमुळे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास ३० हजार लोक एकट्या भारतात मृत्यू पावतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून देशात दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू होतो. यात १५ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वात जास्त आहे.
रेबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार कुत्र्यांपासून, जंगली कोल्ह्यांपासून, वटवाघुळापासून चावा घेतल्याने होतो. ‘रेबीज’चे दुसरे नाव मृत्यू आहे. आजारापूर्वी श्वानदंशानंतर संपूर्ण प्रतिबंधक लसीकरण व जखमेवर उपाययोजना हाच जीवनाचा आधार आहे. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रु ग्णालयात नि:शुल्क लस उपलब्ध आहे, मात्र कुठल्याही पशु चिकित्सालयात ही सोय उपलब्ध नाही. हा रोग होऊ नये म्हणून श्वानाकरिता नि:शुल्क नियमित लसीकरण अपेक्षित आहे. परंतु ही सोय उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरातील, गावातील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही हे वास्तव असले तरी या दिशेने संशोधन व जनजागृती करून या समस्येवर मात केली जाऊ शकते, असे तज्ज्ञाचे मत आहे.

नि:शुल्क लसीकरणासाठी संस्थांचा पुढाकार
पशुधन विकास अधिकारी डॉ. अजय पोहरकर यांनी सांगितले, पशु सर्वचिकित्सालय नागपूर व नावार संस्था आणि ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि.’ या संस्थांच्या सहभागाने पाळीव प्राण्याकरिता ‘अ‍ॅण्टी रेबीज’ लसीकरणाची नि:शुल्क सोय उपलब्ध केली आहे. तसेच सरकारने नागपुरात ‘वन हेल्थ इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

लक्षणे केव्हा दिसतील याचा नेम नाही
श्वानदंश झाल्यानंतर त्याची लक्षणे केव्हा दिसून येतील याचा नेम राहत नाही. पहिल्या काही दिवसात किंवा एक वर्षांनंतरही ही लक्षणे दिसून येऊ शकतात. दंश झालेल्या जागेवर पुरळ येणे, खाज सुटणे, झिणझिण्या येणे, ताप येऊन डोके दुखणे, स्रायू दुखणे, यात रोग्याला प्रकाशाची व पाण्याची भीती वाटणे ही काही प्राथमिक लक्षणे आहेत.

दंश होताच डॉक्टरांशी संपर्क साधा 


दंश होताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. यावर विशिष्ट असे उपचार नाहीत, पण वेळीच लस (इन्जेक्शन) घेतल्यास त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविता येते.
जागतिक रॅबीज दिनानिमित्त २८सप्टेंबर २०१९ ला पशु सर्वाचिकित्सालय, महाराज बाग रोड, सीताबर्डी नागपूर येथे सकाळी ८ ते १२ या वेळेत पाळीव तसेच मोकाट कुत्रे व मांजरींना नि:शुल्क अँटी रॅबीज लस टोचण्यात येणार आहे. पशुप्रेमी व पशुकल्याणार्थ कार्य करणाऱ्यांनी व नागपूर महानगर पालिकेने सहभाग नोंदवून रॅबीज मुक्त देश ही संकल्पना साध्य करण्याकरिता जास्तीत जास्त कुत्रे व मांजरी यांचे नि:शुल्क लसीकरण करून घ्यावे.
डॉ. अजय पोहरकर
पशुधन विकास अधिकारी
अध्यक्ष म.रा. पशुवैद्यक परिषद

एकदा रॅबीज झाल्यास १०० टक्के मृत्यू 

रॅबीज हा ‘रेबडो व्हायरस’ नावाचा विषाणू रोगट प्राण्यांच्या लाळेतून संपर्क स्थापित झाल्यावर होतो. हा रोग कुत्रा चावल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. दंशमार्गाने रॅबीजचे विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात व ते मज्जातंतूपर्यंत पोहचतात. यामुळे मेंदूला सूज येते. मेंदूमधून हे रॅबीजचे विषाणू लाळोत्पादक ग्रंथीत शिरतात व त्यानंतर लाळेत या विषाणूचा प्रादुर्भाव जाणवायला लागतो. एकदा रॅबीज झाल्यास १०० टक्के मृत्यूचा धोका असतो. यामुळे श्वानदंश होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे आवश्यक असते.
डॉ. चंद्रशेखर मेश्राम
मेंदू रोग तज्ज्ञ

Web Title: World Rabies Day: One person dies of rabies every 25 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.