जागतिक रेबीज दिन; नागपूर विभागात तब्बल १५२३ जणांना रेबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 07:00 AM2021-09-28T07:00:00+5:302021-09-28T07:00:06+5:30

Nagpur News नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे.

World Rabies Day; As many as 1523 people contracted rabies in Nagpur division | जागतिक रेबीज दिन; नागपूर विभागात तब्बल १५२३ जणांना रेबीज

जागतिक रेबीज दिन; नागपूर विभागात तब्बल १५२३ जणांना रेबीज

googlenewsNext
ठळक मुद्देशासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद

सुमेध वाघमारे

नागपूर : श्वान, मांजरीने चावा घेतल्याने होणाऱ्या ‘रेबीज’चे दुसरे नाव मृत्यू आहे. जगात दरवर्षी सुमारे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास ३० हजार लोकांचे मृत्यू एकट्या भारतात होतात. असे असताना, रेबीज या भयंकर रोगाबाबत आजमितीला जनतेत फारशी जागरूकता नाही. धक्कादायक म्हणजे, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे. (World Rabies Day)

रेबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार कुत्रे, मांजर, जंगली कोल्ह्यांपासून ते वटवाघुळाने चावा घेतल्याने होतो. श्वानदंशानंतर संपूर्ण प्रतिबंधक लसीकरण व जखमेवर उपाययोजना हाच जीवनाचा आधार आहे. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात नि:शुल्क लस उपलब्ध आहे. मात्र, कुठल्याही पशुचिकित्सालयात ही सोय उपलब्ध नाही. हा रोग होऊ नये म्हणून श्वानाकरिता नि:शुल्क नियमित लसीकरण अपेक्षित आहे. परंतु, ही सोय उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरांतील, गावांतील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही हे वास्तव असले, तरी या दिशेने संशोधन व जनजागृती करून अज्ञान दूर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

-नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १०५२ रेबीजचे प्रकरण

आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२१ या दरम्यान सर्वाधिक रेबीजचे प्रकरण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. पाच वर्षांत १०५२ रुग्णांना रेबीज झाला आहे. या शिवाय, भंडारा जिल्ह्यात ३२, चंद्रपूर जिल्ह्यात ९८, गडचिरोली जिल्ह्यात १८७, गोंदिया जिल्ह्यात ५०, तर वर्धा जिल्ह्यात १०४ असे एकूण नागपूर विभागात १५२३ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, रेबीजवर उपचार नसल्याने असे रुग्ण रुग्णालयात आले तरी त्यांना परत पाठविले जाते. यामुळे रेबीज रुग्णांचा मृत्यू घरी झाला असला तरी शासकीय नोंदीत केवळ २ मृत्यू आहे.

-गैरसमजापोटी वाढत आहे रेबीज

‘रेबीज’मुळे मृत्यू अटळ आहे हे माहीत असतानाही अँटिरेबीजची लस गैरसमजापोटी घेतली जात नसल्याचेही समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, लस दिलेल्या कुत्र्याच्या दंशानंतर रेबीज होत नाही हा गैरसमज आहे. पाळीव कुत्रे असले तरी लस घ्यायलाच हवी. तीन महिन्यांपर्यंतच्या वयाचा कुत्रा चावल्यानंतर अँटिरेबीजची लस घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण कुत्रा लहान असला तरी रेबीज होणार नाही हा गैरसमज आहे.

- एकदा रेबीज झाल्यास १०० टक्के मृत्यू

रेबीज हा ‘रेबडो व्हायरस’ नावाचा विषाणू रोगट प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. हा रोग कुत्रा चावल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. रेबीजचे विषाणू शरीराच्या मज्जातंतूपर्यंत पोहोचतात. यामुळे मेंदूला सूज येते. एकदा रेबीज झाल्यास १०० टक्के मृत्यूचा धोका असतो. यामुळे श्वानदंश होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे महत्त्वाचे असते. भारतात रेबीजचे रुग्ण अद्यापही कमी झालेले नाहीत. रेबीज हा सर्वाधिक मोकाट कुत्र्यांमुळे होत असल्याने कुत्र्यांना लस देणे गरजेचे आहे.

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मेंदू रोग तज्ज्ञ

Web Title: World Rabies Day; As many as 1523 people contracted rabies in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा