जागतिक स्थलांतरित पक्षीदिन; २५० च्यावर परदेशी पक्ष्यांनी दिली विदर्भाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 07:00 AM2021-05-08T07:00:00+5:302021-05-08T07:00:01+5:30

Nagpur News birds कोरोनाच्या भयकारी परिस्थितीच्या काळात यावर्षी जगभरातील २५०च्यावर प्रजातीच्या प्रवासी पक्ष्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करत विदर्भाला भेट दिली. स्थानिक आणि स्थलांतरित मिळून विदर्भात दिसणाऱ्या ४७०च्या जवळपास प्रजातीच्या पक्ष्यांमध्ये यांचा समावेश आहे.

World Migratory Bird Day; About 250 foreign birds visited Vidarbha |  जागतिक स्थलांतरित पक्षीदिन; २५० च्यावर परदेशी पक्ष्यांनी दिली विदर्भाला भेट

 जागतिक स्थलांतरित पक्षीदिन; २५० च्यावर परदेशी पक्ष्यांनी दिली विदर्भाला भेट

Next

 

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या भयकारी परिस्थितीच्या काळात यावर्षी जगभरातील २५०च्यावर प्रजातीच्या प्रवासी पक्ष्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करत विदर्भाला भेट दिली. स्थानिक आणि स्थलांतरित मिळून विदर्भात दिसणाऱ्या ४७०च्या जवळपास प्रजातीच्या पक्ष्यांमध्ये यांचा समावेश आहे. निसर्गाचे जागतिक राजदूत असलेल्या या पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या हालचाली पर्यावरणाशी जोडणाऱ्या व निसर्गचक्राची आठवण करून देणाऱ्याच आहेत.

गेल्या वर्षभरापासून जगभरातील मानवी वंश कोरोना नावाच्या भयंकर विषाणूच्या भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. मात्र, या भयकारी परिस्थितीत माणसांना उडण्याची, आनंदी गाणे गाण्याची शिकवण मुक्तविहार करणारे हे पक्षी देत आहेत. स्थलांतरित पक्षी केवळ पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणीच कनेक्ट होत नाहीत तर ते लोकांना पुन्हा निसर्गाशी आणि पृथ्वीवर इतर प्राण्यांशी जोडतात. पक्षी शहरे आणि ग्रामीण भागात, उद्याने आणि परसबागेत, जंगले आणि पर्वत, ओली जमीन आणि किनाऱ्यांवर, असे कुठेही आढळू शकतात. ते या सर्व निवासस्थानांना जोडतात आणि आपल्याला ग्रह, पर्यावरण, वन्यजीव आणि एकमेकांशी आपले स्वत:चे कनेक्शन आठवून देतात. कोट्यवधी स्थलांतरित पक्ष्यांनी त्यांच्या प्रजनन आणि उदरभरणाच्या साईट्समध्ये गाणे, उडणे आणि वाढणे सुरूच ठेवले आहे. साथीच्या आजारादरम्यान आपल्या हालचाली मर्यादित ठेवून बऱ्याच क्रियाकलापांना कमी करताना जगभरातील लोक पक्षी ऐकत आणि पाहात आहेत. हे पक्षीगाणे सांत्वन आणि आनंदाचे स्रोत बनले आहे.

पक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांनी सांगितले, युरोप, अमेरिका, ब्राझील, डेन्मार्क, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रीका, स्पेन, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, हिमालयापर्यंतचे हे पाहुणे शेकडो, हजारो किलोमीटर प्रवास करून पोहोचले. कॉमन पोचार्ड, रेड क्रेस्टेड पाेचार्ड, लेसर व्हिसलिंग डक, गढवाल, नार्दर्न शॉवलर, बार हेडेड गीज, कलहंस, कांड्या करकोचा, साधा करकोचा, काळा करकोचा, नार्दर्न पिनटेल, मलार्ड, टफ्टेड पोचार्ड, गारगणी, कुक्कू, क्रस्टेड ग्रीप, ओरिएंटल स्टॉर्क, लहान कानाचा पिंगळा, फिशिंग ईगल, हॉर्नबिल, रुडी शेल डक, ब्लॅक आयबीज, सारस क्रेन, बझार्ड अशा अनेक पक्ष्यांची यादी लोंढे यांनी मांडली.

संवर्धनाची जबाबदारी सर्वांची

स्थलांतरित किंवा स्थानिक पक्ष्यांच्या आणि त्यांच्या अधिवासांच्या संवर्धनाची जबाबदारी आपली सर्वांची आहे. केवळ वन विभाग नाही तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, मत्स संचालनालय, मासेमार संघटना, पाटबंधारे विभाग, पक्षी निरीक्षक, अभ्यासक, एनजीओ आणि सामान्य लाेकांच्या समन्वयातूनच ते शक्य हाेऊ शकेल.

- अविनाश लाेंढे, पक्षी अभ्यासक

Web Title: World Migratory Bird Day; About 250 foreign birds visited Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app