खाण उद्योगातील बदलांवर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:27+5:302021-02-24T04:09:27+5:30
नागपूर : खाण उद्योगामध्ये होत असलेल्या बदल व संशोधनावर आधारित विशेष कार्यशाळेचे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आयोजन करण्यात आले होते. ...

खाण उद्योगातील बदलांवर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यशाळा
नागपूर : खाण उद्योगामध्ये होत असलेल्या बदल व संशोधनावर आधारित विशेष कार्यशाळेचे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आयोजन करण्यात आले होते. शासकीय तंत्रनिकेतनच्या खनिकर्म व खाण सर्वेक्षण विभागातर्फे आयोजित ‘युवा उद्योजकांसाठी असलेल्या संधी’ या विषयावरील या कार्यशाळेत खनिकर्म विषयात शिक्षण घेत असलेले ६०३ विद्यार्थी ‘ऑनलाईन’ माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले, रॉकेट सिस्टिम्स अॅन्ड प्रोजेक्टचे संस्थापक मनोज गुऱ्हारीकर, गौरव ब्राम्हणकर तसेच शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य व सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे उपस्थित होते.
खाण उद्योगात नवीन उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी देशात नव्याने विकसित होत असलेल्या उद्योगाकडे आकर्षित होऊन स्वत:चा उद्योग सुरू करावा, असे दिवाकर गोखले यांनी केले. निसर्ग आणि खाण काम याचा उत्तम संतुलन राखण्याच्या दृष्टीने डब्ल्यूसीएलने हाताळलेल्या विविध इको संवर्धन प्रकल्पाची माहिती दिली.
उद्योग क्षेत्रामध्ये परंपरागत उपलब्ध असलेल्या संधीपेक्षा नवसंशोधनावर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी युवा अभियंत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन मनोज गुऱ्हारीकर यांनी केले. उद्योग व शिक्षण संस्थांनी एकत्रितपणे कार्य केले तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो, असे डॉ. डायगव्हाणे यांनी प्रतिपादन केले.
‘जीएचआरसीएसटी’ महाविद्यालयाच्या बीबीए विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती समसरिया यांनी उद्योजकतेच्या आवश्यक बाबींवर ‘फर्स्ट फूट फॉरवर्ड’ सत्र आयोजित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. राजेश्वरी वानखेडे, बी.जे. नायडू, डॉ. रूपाली लोंढे, प्रा. जे. टी. रावण, प्रा. देवेंद्र सुरकार, प्रा. हेमंत शेंडे यांनी अथक प्रयत्न केले.