कामगार रुग्णालय विकासाच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST2020-12-25T04:09:09+5:302020-12-25T04:09:09+5:30
नागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार रुग्णालय आपल्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्षात विशेषज्ञासह इतरही रिक्त ...

कामगार रुग्णालय विकासाच्या मार्गावर
नागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार रुग्णालय आपल्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्षात विशेषज्ञासह इतरही रिक्त जागा भरण्यावर भर देणार आहे. सोबतीला यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामुळे दरम्यानच्या काळात सोयींअभावी रुग्णालयात कमी झालेली रुग्णांची गर्दी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे, कामगार रुग्णालय विकासाचा मार्गावर आहे, असा विश्वास कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांनी व्यक्त केला.
सोमवारी पेठेतील राज्य कामगार रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सव २८ डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या रुग्णालयाला अखेरची घरघर लागली होती. विविध संवर्गातील सुमारे ७० टक्के रिक्तपदे होती. विशेषज्ञ असतानाही अत्याधुनिक यंत्रसामुग्री नसल्याने महत्त्वाच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या होत्या. आकस्मिक गंभीर आजाराच्या रुग्णांना नेहमी ‘मेडिकल रेफर’केले जात होते. यातच नेहमीच राहत असलेल्या औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णालय ‘ऑक्सिजनवर’ आले होते. परंतु मागील दोन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या प्रयत्नामुळे या रुग्णालयाला चांगले दिवस येऊ पाहत आहे. नवीन मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले आहे. दुसरे ऑपरेशन थिएटर तयार करण्याचा संकल्प वैद्यकीय अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सोडला आहे. विशेष असे की, सुवर्ण महोत्सवी वर्षात कामगार रुग्णालयाचा कारभार महिलांच्या हाती आहे. प्रशासकीय अधिकारी डॉ. जी. एस. धवड तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. ए. चौधरी असल्याचे सांगत विदर्भातील ३ लाख ५७ हजार ५७० विमाधारकांच्या आरोग्याची जबाबदारी आम्ही महिला सांभाळत असल्याचे डॉ. देशमुख यांनी आवर्जून सांगितले.
-लवकरच रुग्णसेवेत ‘आयसीयू’
डॉ. देशमुख म्हणाल्या, विशेषज्ञांच्या १४ पैकी तब्बल ११ जागा रिक्त होत्या. यातील ९ जागा तातडीने भरण्यात आल्या. फिजिशियन व रेडिओलॉजीची जागा रिक्त असून लवकरच ती भरली जाणार आहे. विशेषज्ञ मिळाल्याने कधी न होणारी ‘ईएनटी’ विभागातील शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. मागील ४० वर्षांत कॅज्युअल्टी विभाग नव्हता. मात्र आता हा विभाग तयार करण्यात आला आहे. अल्प मनुष्यबळ असताना गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहे, ही या रुग्णालयाची जमेची बाजू आहे. लवकरच रुग्णालयात ‘आयसीयू’ म्हणजे अतिदक्षता विभाग तयार होईल, असेही डॉ. देशमुख म्हणाल्या.
-सोसायटीमुळे मोलाची अधिक मदत
अडचणींवर मात करीत कामगार रुग्णालय आपला विकास साधत आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्याच्या प्रयत्नाना वेग आला आहे. सोसायटी तयार झाल्यानंतर रुग्णालयात सकारात्मक बदल सुरू झाले आहेत. यामुळे ‘ओपीडी’सह ‘आयपीडी’ वाढण्याची शक्यता आहे.
-डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय, नागपूर