कामगार रुग्णालयाला कामगार दिनाचा विसर
By Admin | Updated: May 2, 2015 02:28 IST2015-05-02T02:28:08+5:302015-05-02T02:28:08+5:30
१ मे, जागतिक कामगार दिन, हा जगभरातील कामगारांच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे.

कामगार रुग्णालयाला कामगार दिनाचा विसर
सुमेध वाघमारे नागपूर
१ मे, जागतिक कामगार दिन, हा जगभरातील कामगारांच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. परंतु या दिवसाचा विसर कामगारांच्या आरोग्य सांभाळणाऱ्या सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला पडला आहे. या दिनाच्या निमित्ताने कामगारांच्या आरोग्यावर विशेष कार्यक्रम घेणे सोडा, इमारतीवर ध्वजही फडकविला जात नाही.
नागपूर जिल्ह्यात सुमारे २ हजार लहान मोठे उद्योग आहेत. यात सुमारे ५० हजार कामगार आहेत. उद्योग व कारखान्यात शिसे, फॉस्फरस, सफ्लाईन, बेझिंन, मॅगनीज इत्यादी घातक रसायने व नायट्रटेच्या धुरामुळे कामगारांना छातीचे तसेच इतरही आजार होतात. त्यांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून १९७० मध्ये नागपुरात या कामगार रुग्णालयाची स्थापन करण्यात आली. या कामगारांकडून वार्षिक अंदाजपत्रकनुसार सुमारे ८ कोटी रुपयांच्यावर निधी रुग्णालयाला मिळतो. परंतु येथे आकस्मिकरीत्या भरती झालेल्या व मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर येथे उपचारच होत नाहीत. गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या शस्त्रक्रिया ते मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मेडिकल किंवा खाजगी रुग्णालयांची रुग्णांना वाट धरावी लागते. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांपासून ते चतुर्थ श्रेणी पदांपर्यत ५५ टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील आकस्मिक विभाग असून नसल्यासारखा आहे. दुपारी २ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत आकस्मिक विभागाचा कारभार वॉर्डातील एक परिचारिका पाहते. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ९ ते १ पर्यंत आहे, मात्र सर्व वरिष्ठ डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी १० वाजल्याशिवाय ओपीडीत बसत नाही. १०.३० वाजता सुरू होणारी ओपीडी दोन तासात बंद होते. अशा अनेक अडचणीला हे रुग्णालय समोर जात आहे. कामगाराच्या आरोग्याप्रति गंभीर नसलेले प्रशासन रुग्णालयात कामगार दिन साजरा करण्यातही उदासीनता दाखवित आहे. तज्ज्ञाच्या मते या दिवशी कामगारांसाठी आरोग्य शिबिरे, त्यांच्या विविध आजारांच्या संदर्भातील जनजागृती करणे आवश्यक आहे. परंतु या सर्वांचा विसर पडला आहे. रुग्णालयाच्या इमारतीवर या दिनाच्या निमित्ताने झेंडा फडकविण्याचे औचित्यही रुग्णालय प्रशासन दाखवित नाही. एकप्रकारे कामगारांच्या आरोग्याप्रति उदासीनता दाखवून त्यांची पिळवणूक सुरू आहे. पूर्वी याच पिळवणुकीच्या विरोधात कामगार एकजूट झाले, उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले, हक्क मिळाले. कामगार दिन साजरा होऊ लागला. आता पुन्हा तोच उठाव आरोग्याचे हक्क मिळण्यासाठी करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.