रोडखाली जलवाहिनी : सहा वर्षांपासून या मार्गाची देखभाल नाही राजीव सिंग। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नागरिकांची सुविधा व्हावी यासाठी सिमेंट काँक्रिटचे रोड निर्माण केले जात आहेत. परंतु नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना सिमेंट रोडमुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी अर्धवट कामामुळे तर काही ठिकाणी अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने. पहिल्या टप्प्यातील सुमारे २.७ किलोमीटर लांबीच्या तीन रोडच्या खालून जलवाहिनी गेली असल्याने, या रोडचे काम अशक्य झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैद्यनाथ चौक ते घाट रोड चौक या दरम्यानच्या १ कि.मी., मेडिकल चौक ते क्रीडा चौक या दरम्यानच्या ७०० मीटर व खामला ते सावरकरनगर दरम्यानचा रोड सिमेंटचा केला जाणार होता. परंतु या रोडखालून जलवाहिन्या गेल्या आहेत. सिमेंटीकरण केल्यास रोडखालील जलवाहिन्यांना नुकसान होण्याचा धोका आहे. जलवाहिनी दुसरीकडे टाकावयाची झाल्यास कामाचा खर्च तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रोडचे सिमेंटीकरण होण्याची शक्यता नाही. सिमेंट रोडच्या पहिल्या टप्प्यात ६ जून २०११ रोजी युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड कंपनीला २५.७७५ कि.मी. लांबीच्या ३० रोडचे सिमेंटीकरण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यावर १०४.३५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. पहिल्या टप्प्यातील कामांना सहा वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. परंतु या तीन रोडचे सिमेंटीकरण रखडलेले आहे. एवढेच नव्हे तर या रोडवर खड्डे असूनही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. बैद्यनाथ चौक ते घाट रोड चौक या दरम्यानच्या रोडवरील गिट्टी निघाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, अन्य दोन रोडची अशीच अवस्था आहे. पहिल्या टप्प्यातील सिमेंट रोडचा खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करीत आहे. पहिल्या टप्प्यातील ३० पैकी १३ रोडची कामे करण्यात आली असून, चार कामे सुरू आहेत. पाच रोडची कामे तांत्रिक कारणांनी अडकलेली आहेत. आठ रोडच्या कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. बैद्यनाथ चौक ते घाट रोड चौक या दरम्यानच्या रोडखालून ७०० मि.मी.व्यासाची जलवाहिनी गेली असल्याला महापालिकेचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दुजोरा दिला आहे. तसेच अन्य दोन रोडखालूनही जलवाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे या रोडची कामे रखडलेली आहेत. सध्या या रोडच्या कामांची जबाबदारी कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांच्यावर आहे. माहिती असूनही निवड कशी? सिमेंट रोडच्या पहिल्या टप्प्यात शहरातील रस्त्यांचा समावेश करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या रोडखालून जलवाहिन्या असल्याबाबतची माहिती होती. त्यानतंरही या रोडचा यात समावेश का केला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिल्या टप्प्यातील सिमेंट रोडचा आराखडा दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तयार करण्यात आलेला नाही. तांत्रिक बाबींचा अभ्यास नसल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
पहिल्या टप्प्यातील तीन सिमेंट रोडचे काम अशक्य
By admin | Updated: June 11, 2017 02:40 IST