समाजदूत बनून कामे करा
By Admin | Updated: December 14, 2014 00:46 IST2014-12-14T00:46:00+5:302014-12-14T00:46:00+5:30
आदिवासी घटकांसाठी शासन उपजीविकेच्या अभिनव कल्पना अंमलात आणत आहे. त्यासाठी सक्षम व्हा आणि समाजाघटकांचे दूत म्हणून काम करा, असा सल्ला राज्यपाल सी. विद्यासागर राव

समाजदूत बनून कामे करा
राज्यपालांचा सल्ला : पेसा कायदा कार्यशाळेचे उद्घाटन
चंद्रपूर : आदिवासी घटकांसाठी शासन उपजीविकेच्या अभिनव कल्पना अंमलात आणत आहे. त्यासाठी सक्षम व्हा आणि समाजाघटकांचे दूत म्हणून काम करा, असा सल्ला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अधिकाऱ्यांना दिला.
स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) -१९९६ आणि वनहक्क अधिनियम -२००६ कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रसायन व खत राज्य मंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस, आमदार नाना शामकुळे, आमदार बाळू धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य वन संरक्षक संजय ठाकरे, पोलीस अधिक्षक राजीव जैन मंचावर उपस्थित होते.
हिंदीतून भाषणाची सुरूवात करून राज्यपाल नंतर इंग्रजीतून बोलले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा अनुवाद मराठीत केला. राज्यपाल म्हणाले, राज्यघटनेच्या पाचव्या परिच्छेदानुसार राष्ट्रपतींना आदिवासींच्या संरक्षणाचे अनेक अधिकार आहेत. त्यानुसार, आपण या कार्यशाळेसाठी आलो आहोत. पेसा कायद्यासंदर्भात १९९६ मध्ये निर्णय झाल्यावर आदिवासींना बरेच अधिकार मिळाले. आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभांना मिळालेल्या अधिकारातून त्यांच्यात आर्थिक सक्षमता निर्माण करणे आणि त्यासाठी दूत म्हणून काम करणे हे आता अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. ग्रामसभांना नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिकार मिळाला आहे. त्यांची हक्काची जमीन आता कुणी हिसकावू शकणार नाही. सरकार त्यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते ब्रह्मपुरी आणि वरोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांनी केले. (प्रतिनिधी)