महाराजबाग रस्त्याचे काम अपूर्णच
By Admin | Updated: March 31, 2017 02:52 IST2017-03-31T02:52:13+5:302017-03-31T02:52:13+5:30
महाराजबाग ते विद्यापीठ ग्रंथालय या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. परंतु अजूनही डांबरीकरण झालेले नाही.

महाराजबाग रस्त्याचे काम अपूर्णच
काम बंदच : नागपूरकर त्रस्त : डांबरीकरण कधी होणार?
नागपूर : महाराजबाग ते विद्यापीठ ग्रंथालय या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. परंतु अजूनही डांबरीकरण झालेले नाही. ६६० मीटरच्या या रस्त्याचे डांबरीकरण कधीपर्यंत पूर्ण होणार, याबाबत महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारीसुद्धा ठोसपणे सांगू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. त्याचा त्रास मात्र वाहन चालकांना सोसावा लागत आहे.
या रस्त्याची रुंदी फुटपाथ व डिव्हायडरसह २४ मीटर इतकी आहे. या २४ मीटरमध्ये रस्त्याच्या डांबरीकरणासोबतच डिव्हायडर व फुटपाथचे कामही करायचे आहे. महाराजबाग प्रवेशद्वार ते विद्यापीठ ग्रंथालयासमोर सेनापती बापट चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे.
मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे यांनी सांगितले की, महाराजबागच्या रस्त्यावर डांबरीकरणासह अनेक काम एकाच वेळी पूर्ण करावयाचे आहे. यामुळे कामाला वेळ लागत आहे. डिव्हायडरचे काम सुरू होते. परंतु स्ट्रीट लाईटचे काम सुरू असल्याने वीज विभागाच्या सांगण्यावर काम थांबवण्यात आले आहे. विजेचे काम सुरू असल्याने रस्त्याचे काम बंद करावे लागले. नाही तर पुन्हा खोदावे लागले असते. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार, असा प्रश्न लोकमतने विचारला असता त्यांनी मौन पाळले, नंतर वीज विभागाला याबाबत विचारा, असे सांगितले.(प्रतिनिधी)
डिव्हायडर व फुटपाथचे कामही अपूर्णच
महाराजबागच्या मार्गावर फुटपाथ बनविण्याचे काम सुरू आहे. परंतु डांबरीकरणाप्रमाणेच याचे कामही संथगतीने सुरू आहे. महाराजबागच्या जवळपासच फुटपाथ बनलेले दिसून येतात. डिव्हायडरचे कामही सुरू होते. परंतु ते आता बंद पडले आहे. डिव्हायडरसुद्धा पूर्ण झालेले नाही
गटारी उघड्याच
रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी गडरलाईन टाकण्यात आली आहे. या गडरलाईनवर झाकण बसविण्याचे कामही बंद पडले आहे. गटारी उघड्याच आहेत.