नाटकांची चळवळ वाढविण्यासाठीच कार्य करा

By Admin | Updated: September 21, 2015 03:03 IST2015-09-21T03:03:02+5:302015-09-21T03:03:02+5:30

एखादी संस्था निर्माण होते तेव्हा त्यात वादप्रवाद निर्माण होतात. पण हे वादप्रवाद संस्थेलाच धोका निर्माण करीत असतील तर विचार करायला हवा.

Work to increase the movement of plays | नाटकांची चळवळ वाढविण्यासाठीच कार्य करा

नाटकांची चळवळ वाढविण्यासाठीच कार्य करा

 ज्येष्ठ रंगकर्मी शफी नाईकवाडी यांचे आवाहन : नाट्य परिषदेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन
नागपूर : एखादी संस्था निर्माण होते तेव्हा त्यात वादप्रवाद निर्माण होतात. पण हे वादप्रवाद संस्थेलाच धोका निर्माण करीत असतील तर विचार करायला हवा. नाट्यकलावंतांनी नागपुरात दुसरी शाखा निर्माण केली आहे. ही शाखा कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर नाट्यदेवतेची सेवा करण्यासाठी आहे. उत्तमोत्तम नाटकांचे सादरीकरण आणि नव्या दमदार प्रायोगिक नाटकांचे सादरीकरण करताना नाट्य चळवळीच्या वृद्धीसाठी प्रयत्न करा, असा सल्ला देत ज्येष्ठ रंगकर्मी शफी नाईकवाडी यांनी नागपूरच्या नाट्य परिषदेच्या नव्या शाखेचे उद्घाटन करीत सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर महानगर शाखेचा ‘नाट्यसेवारंभ’ सोहळा शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी विनोद कुळकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून अ़भा़ मराठीनाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कार्यकारिणी सदस्य दिलीप देवरणकर, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चनाखेकर, परिषदेच्या नव्या शाखेच्या अध्यक्ष नलिनी बन्सोड, उपाध्यक्ष मिथून मित्रा व सरकार्यवाह पुजा पिंपळकर उपस्थित होते़ ज्येष्ठ दिग्दर्शक मदन गडकरी, महेश पातुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
नागपुरातील नाट्य परिषदेच्या नाराजीबाबत अप्रत्यक्षपणे नलिनी बन्सोड यांनी टीका केली. यासंदर्भात स्वत:च कोणत्याही बाबींवर भ्रम निर्माण करू नका आणि निराशेला बळी पडू नका, असे आवाहन नाईकवाडी यांनी केले.
नव्या शाखेच्यावतीने रंगकर्मींसाठी पुरस्कार व नव्या नाट्य स्पर्धांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. रंगकर्मी व प्रकाशयोजनाकार सपनदादा मित्रा स्मृती ‘सपनरंग’ पुरस्कार व आशिष कांबळे स्मृती ‘रंगआशिष’ पुरस्कार परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रंगकर्मी सलिम शेख यांनी केले़
प्रास्ताविक नलिनी बन्सोड यांनी केले. ऊर्मिला राऊत यांच्या नृत्य चमूने कथ्थक नृत्य सादर केले़ मल्हार गु्रपच्यावतीने नांदी सादर करण्यात आली़(प्रतिनिधी)

जुन्या नाट्य परिषदेच्या कलावंतांची अनुपस्थिती
एखाद्या महानगरात नाट्य परिषदेच्या दोन शाखा असणे नवे नाही. नागपूरचा पसारा वाढत असताना मध्यवर्तीने येथे दुसरी शाखा निर्माण करायला परवानगी दिली. त्याचे आज उद्घाटन करण्यात आले. पण यानिमित्ताने जुनी आणि नवी शाखा यांच्यातील कार्यकारिणीत असणारा तणाव रंगकर्मींना जाणवला. जुन्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य या समारंभाला उपस्थित नव्हते.

Web Title: Work to increase the movement of plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.