कला क्षेत्रात परिश्रम करा
By Admin | Updated: February 3, 2017 02:52 IST2017-02-03T02:52:54+5:302017-02-03T02:52:54+5:30
अनेकजण अल्पावधीत आंतरराष्ट्रीय कलाकार बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कला क्षेत्रात ते शक्य नसते. कला क्षेत्र जेवढे सहज वाटते तसे ते नाही.

कला क्षेत्रात परिश्रम करा
दीपक जोशी : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर : अनेकजण अल्पावधीत आंतरराष्ट्रीय कलाकार बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कला क्षेत्रात ते शक्य नसते. कला क्षेत्र जेवढे सहज वाटते तसे ते नाही. या क्षेत्रात जे कुणी मोठे झाले, त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत. कठोर तपस्या केली आहे. त्यामुळे खोट्या प्रलोभनांना व भूलथापांना बळी पडू नका, आणि कठोर परिश्रम करा. असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे माजी विभाग प्रमुख दीपक जोशी यांनी केले.
‘आर्ट फ्लो’ या कला क्षेत्रातील तरुणांच्या ग्रुपतर्फे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित चित्र प्रदर्शनाचे गुरुवारी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून निशिकांत देशमुख, सदानंद चौधरी व समीर देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्ट फ्लो ग्रुपतर्फे मागील २० सप्टेंबर २०१६ रोजी घेण्यात आलेल्या ‘लँडस्केप’ स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यात पहिला पुरस्कार गोविंद परांडे यांनी पटकाविला तर व्दितीय पुरस्कार मारोती मानकर यांनी व तृतीय पुरस्कार सुमित ब्राह्मणकर यांनी मिळविला. याशिवाय विश्वनाथ तांबे, कुणाल दाभाडे, स्वप्निल शिरोडकर, सृष्टी लांजेवार व प्रियंका शिंगणे यांना प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करण्यात आले.
जोशी पुढे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तोच नियम कला क्षेत्रासाठी सुद्धा लागू होतो. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन योगेश धनकासार यांनी केले तर दीपांकर उमरे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)