आधी काम, नंतर मंजुरी
By Admin | Updated: August 26, 2014 01:00 IST2014-08-26T01:00:04+5:302014-08-26T01:00:04+5:30
महापालिकेचे अधिकारी नियमांना डावलून काम करीत एक प्रकरण पुढे आले आहे. अधिकाऱ्यांनी कामाची मंजुरी मिळण्यापूर्वी मर्जीतील ठेकेदारांना काम दिले आहे. ठेकेदाराने काम पूर्णही केले.

आधी काम, नंतर मंजुरी
पेंच-४ च्या कामात घोळ : दोषी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
नागपूर : महापालिकेचे अधिकारी नियमांना डावलून काम करीत एक प्रकरण पुढे आले आहे. अधिकाऱ्यांनी कामाची मंजुरी मिळण्यापूर्वी मर्जीतील ठेकेदारांना काम दिले आहे. ठेकेदाराने काम पूर्णही केले. ठेकेदाराला या कामाचे पेमेंट करण्यासाठी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आल्याने हे प्रकरण पुढे आले. स्थायी समितीनेही याला मंजुरी दिली आहे. या प्रकरणामुळे मनपात अधिकाऱ्यांची सुरू असलेली मनमानी उघडकीस आली आहे.
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत सुरू असलेल्या पेंच-४ चे काम सुरू आहे. या कामात असे निदर्शनास आले की, कामाची निविदा न काढता मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्यात आले. ठेकेदाराने यातील बरेचशे काम पूर्णही केले आहे. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे ठेकेदाराला देण्यासाठी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पेंच-४ चे काम चार भागात विभाजित करुन १० पॅकेजमध्ये करण्यात येत आहे. यातील ‘३-अ’ व ‘५-अ’च्या कामासाठी ज्या ठेकेदाराने निविदा भरली होती, तो ठेकेदार काम करण्यास तयार नव्हता. त्याचदरम्यान पेंच-४ चे काम जलप्रदाय विभागांतर्गत करण्यात येत होते. त्यावेळी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत हस्तक होते. त्यांनी या कामासाठी आयुक्त व स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव आणण्यास सांगितले होते. त्यानंतरच काम सुरू करण्याचे सांगितले होते. परंतु हस्तक यांच्या विनाअनुमतीने हे काम मर्जीतील ठेकेदारांकडून करवून घेण्यात आले. याप्रकरणी बराच वादही झाला होता. ही योजना १०४ कोटी रुपयांची होती. दोन पॅकेजचे काम ३० कोटी रुपयांचे होते. झालेल्या कामाचा प्रस्ताव आज स्थायी समितीने मंजूर केला.
स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सांगितले की, या प्रकरणी एखादा अधिकारी दोषी आहे का, कुणाची चौकशी सुरू आहे का, याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली नाही. असे असतानाही केवळ लोकहिताचा विचार करून या झालेल्या कामाला मंजुरी देण्यात आली. संबंधितप्रकरणी दोषी असलले शशिकांत हस्तक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास कडक कारवाई करण्याचे संकेतही बोरकर यांनी दिले. (प्रतिनिधी)