समृद्धीवरील ७२ टक्के उड्डाणपुलांचे काम प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST2021-08-21T04:11:49+5:302021-08-21T04:11:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे पूर्ण काम सप्टेंबर २०२२ पर्यंत संपविण्याचा राज्य ...

Work on 72 per cent flyovers on Samrudhi is pending | समृद्धीवरील ७२ टक्के उड्डाणपुलांचे काम प्रलंबित

समृद्धीवरील ७२ टक्के उड्डाणपुलांचे काम प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे पूर्ण काम सप्टेंबर २०२२ पर्यंत संपविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. आतापर्यंत अधिग्रहित झालेल्यापैकी ९८ टक्के जमीन कामायोग्य करण्यात आली आहे. परंतु उड्डाणपुलांचे काम मात्र हव्या त्या वेगाने झालेले नाही. ७०१ किलोमीटर मार्गावरील ६९ पैकी ४६ (७२ टक्के) उड्डाणपुलांचे काम प्रलंबित आहे. शिवाय ५१ टक्के मोठ्या पुलांचे काम शिल्लक आहे.

२०१५ साली समृद्धी महामार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर भूमी अधिग्रहणाचे काम सुरू झाले होते. आतापर्यंत ८ हजार ८६१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, त्यासाठी ७ हजार ४२४ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एकूण १६ बांधकाम पॅकेज निश्चित करण्यात आले होते. हे सर्व काम सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. महामार्गात १ हजार ८५० आतापर्यंत विविध स्ट्रक्चर्सचा समावेश राहणार आहे. त्यातील १ हजार ४०५ स्ट्रक्चर्स पूर्ण झाले आहेत. परंतु उड्डाणपूल व मोठे पूल बांधणे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. ३१ मोठ्या पुलांपैकी आतापर्यंत १३ च बांधून झाले असून, १६ पुलांचे काम शिल्लक आहे. दोन मोठे पूल व चार उड्डाणपुलांचे तर काम अद्याप सुरूदेखील झालेले नाही. २४ इंटरचेंजेसपैकी दोन ठिकाणीच काम पूर्ण झाले असून, १७ ठिकाणी काम प्रलंबित आहे. पाच इंटरचेंजेसच्या कामाला तर सुरुवातदेखील झालेली नाही. या मार्गावर एकूण सहा बोगदे राहणार असून, एकाचेही काम पूर्ण झालेले नाही.

वाहनांसाठीचे ८० टक्के भुयारी मार्ग पूर्ण

समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी २११ तर हलक्या वाहनांसाठी ११० भुयारी मार्ग राहणार आहेत. मोठ्या वाहनांसाठीच्या १६८ (८० टक्के) तर लहान वाहनांसाठीच्या ९७ (८८ टक्के) भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय ९३ टक्के पशू व पादचारी भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी असलेल्या ७९ टक्के भुयारी मार्गांचे काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाची सरासरी प्रगती

काम : प्रत्यक्ष प्रगती

जमीन कामयोग्य करणे : ९८.५० टक्के

माती भराव : ८३.१० टक्के

जी.एस.बी. : ७७.२३ टक्के

डी.एल.सी. : ७३.७८ टक्के

पी.क्यू.सी. : ६६.३६ टक्के

स्ट्रक्चर्सचे काम

स्ट्रक्चरचा प्रकार - एकूण संख्या - पूर्ण - प्रगतिपथावरील काम

उड्डाणपूल - ६९ - १९ - ४६

मोठे पूल - ३१ - १३- १६

रेल्वे ओव्हरब्रिज - ८ - २- ५

छोटे पूल - ३०२ - २१० -६०

वाहनांसाठी भुयारी मार्ग - २११ - १६८ - २७

हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग - ११० - ९७ - ५

वन्यजीवांसाठी भुयारी मार्ग - १४- ११- ३

कॅनाॅल पूल - २० - १९ - १

मोऱ्या - ७४८ - ६५८ - ३७

इंटरचेंजेस - २४ - २- १७

बोगदा - ६ - ० - ६

Web Title: Work on 72 per cent flyovers on Samrudhi is pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.