काहे की बेहतरीन गेंदबाजी!
By Admin | Updated: March 27, 2015 02:05 IST2015-03-27T02:05:26+5:302015-03-27T02:05:26+5:30
‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये! ही प्रतिक्रिया आहे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांची.

काहे की बेहतरीन गेंदबाजी!
नागपूर : ‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये! ही प्रतिक्रिया आहे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांची.
भारताने विश्वचषकाचा उपांत्य सामना आॅस्ट्रेलियाला ९५ धावांनी बहाल केल्यानंतर इतर क्रिकेट चाहत्यांसारखेच तिलक यादव देखील निराश झाले. उमेशने ७३ धावांत आॅस्ट्रेलियाचे ४ गडी बाद केले. खापरखेडा नजीकच्या वलनी खाण परिसरात वास्तव्य करणारे तिलक यादव यांना उमेशच्या या कामगिरीबद्दल विचारताच संतापाच्या स्वरात ते म्हणाले,‘ मी संघाच्या पराभवावर कुठलेही भाष्य करणार नाही.’ उमेशच्या गोलंदाजीवर त्यांनी ‘‘काहे की बेहतरीन गेंदबाजी’’, जब मॅच ही हार गये, असे उद्गार काढले.
उमेशने सध्याच्या विश्वचषकात दोनवेळा प्रत्येकी चार गडी बाद केले. एकाच स्पर्धेत दोनवेळा अशी कामगिरी करणारा उमेश पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताच्या पराभवानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अनूचित प्रकार घडू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या निवासस्थानांना सुरक्षा पुरविण्यात आली. पण उमेशच्या घरापुढे कुठलीही सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याचे दिसून आले. (क्रीडा प्रतिनिधी)