महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी
By Admin | Updated: August 14, 2016 02:56 IST2016-08-14T02:56:19+5:302016-08-14T02:56:19+5:30
दारू प्यायलेल्या रुग्णावर उपचार करण्यास थोडी दिरंगाई केल्याने रुग्ण व त्याच्या तीन मित्रांनी कर्तव्यावर

महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी
हिंगणा येथील घटना : कक्षसेवकाला मारहाण
हिंगणा : दारू प्यायलेल्या रुग्णावर उपचार करण्यास थोडी दिरंगाई केल्याने रुग्ण व त्याच्या तीन मित्रांनी कर्तव्यावर असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धमकी दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी कक्ष सेवकास मारहाण केली. ही घटना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. आजवर अशा प्रकारच्या सात घटना घडल्याने महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रपाळीत कर्तव्य बजावण्यास असमर्थतता दर्शविली आहे.
हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालय शहराच्या धनगरपुरा भागात आहे. गुरुवारी रात्री वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्लेषा गाडबैल, परिचारिक रामटेके व कक्ष सेवक डवरे कर्तव्यावर होते. दरम्यान, रात्री ९.४५ वाजताच्या सुमारसा जयहरी लांजेवार (३५, रा. हिंगणा) हा त्याच्या तीन मित्रांसह ग्रामीण रुग्णालयात आला. त्याने अपघातात खरचटल्याचे सांगून उपचार करण्याची सूचना केली. तो दारू प्यायलेला होता. डॉ. गाडबैल या भोजन करीत असल्याने इतर कर्मचाऱ्यांना त्याला पाच मिनिटे थांबण्याची विनंती केली. त्यावर त्याने डवरे यांचा शर्ट पकडून मारहाण करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्याने डॉ. गाडबैल यांना अश्लील शिवीगाळ करून महिला असल्याने सोडून देत असल्याची बतावणी करीत पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर काही वेळातच चौघेही मोटरसायकलने ग्रामीण रुग्णालयातून पळून गेले.
या रुग्णालयात रात्रीपाळीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबतचे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत घोडेराव यांना देण्यात आले. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३५३, ५०४,५०६, १८६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार हेमंत खराबे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)