इंटरनेट वापरताना महिलांनी जागरूक रहावे
By Admin | Updated: February 7, 2015 02:07 IST2015-02-07T02:07:49+5:302015-02-07T02:07:49+5:30
आजचे जग इंटरनेटचे असल्याने त्यापासून दूर राहणे अशक्य आहे. परंतु महिलांच्या बाबतीत ‘सायबर क्राईम’चे प्रमाण वाढीस लागले आहे.

इंटरनेट वापरताना महिलांनी जागरूक रहावे
नागपूर : आजचे जग इंटरनेटचे असल्याने त्यापासून दूर राहणे अशक्य आहे. परंतु महिलांच्या बाबतीत ‘सायबर क्राईम’चे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे महिलांनी इंटरनेट वापरताना जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असे मत सायबर लॉ सल्लागार अॅड. प्रशांत माळी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात साजरा करण्यात येणाऱ्या १३ व्या ‘जस्टा कॉजा’ या राष्ट्रीय विधी महोत्सवादरम्यान शुक्रवारी ‘वूमन अॅन्ड सायबर क्राईम’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिसंवादाला अॅड.महेंद्र लिमये, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रविणा खोब्रागडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. इंटरनेटचा वापर करत असताना चुका करण्याचे टाळावे .त्याचप्रमाणे महिलांना असणारे ‘सायबर क्राईम’चे धोके आणि ‘पासवर्ड’चे महत्त्व यावर अॅड. महेंद्र लिमये यांनी मार्गदर्शन केले. यानंतर सामाजिक माध्यम आणि सायबर क्राईम, अश्लीलता व महिलांचा सन्मान आणि महिलांच्या संवर्धनात शासकीय व न्यायालयीन भूमिका या विषयांवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १२० विद्यार्थ्यांनी भाग घेतला व यावेळी ४० शोधपत्रिका निवडण्यात आल्या. समारोप सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून पोलीस आयुक्त के.के.पाठक तर अध्यक्ष म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अधरा देशपांडे, अॅड.कल्याणी कापसे, अॅड.राहुल ढोबळे, अॅड.सुशील तिवारी, अनिरुद्ध अनंतकृष्णन, अंकित निगम, झांकृती बदानी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)