महिलेने दाबला महिला वकिलाचा गळा
By Admin | Updated: July 21, 2015 03:02 IST2015-07-21T03:02:32+5:302015-07-21T03:02:32+5:30
आपल्या गैरअर्जदार पतीच्या बाजूने खटला लढणाऱ्या एका वकील महिलेचा एका महिलेने गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न

महिलेने दाबला महिला वकिलाचा गळा
न्यायालय कॅन्टीनमधील घटना ठार मारण्याचा होता प्रयत्न घटनेचा डीबीएकडून निषेध
नागपूर : आपल्या गैरअर्जदार पतीच्या बाजूने खटला लढणाऱ्या एका वकील महिलेचा एका महिलेने गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्त मारहाण केली. ही घटना सोमवारी १.३० वाजताच्या सुमारास न्यायमंदिर इमारतीतील अन्नपूर्णा कॅन्टीनमध्ये घडली. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल आणि माजी अध्यक्ष अॅड. सुदीप जयस्वाल यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.
अॅड. सुंदरी चक्रनारायण, असे वकील महिलेचे नाव आहे. त्यांनी सदर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव अश्विनी राहुल पिणे असे असून, ती पांढराबोडी येथील रहिवासी आहे. तक्रारकर्त्या जखमी अॅड. चक्रनारायण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, अश्विनी हिने चार महिन्यापूर्वी आपल्या पतीविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले आहे. त्यावेळी तिने कौटुंबिक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केलेला आहे. या दोन्ही प्रकरणात या महिलेचे वकील अॅड. नरेश राऊत हे आहेत तर गैरअर्जदार पतीचे वकील अॅड. सुंदरी चक्रनारायण आणि अॅड. अजय मदने हे आहेत. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाच्या खटल्याचे कामकाज सुयोग इमारतीमधील न्यायालयात चालते. १७ जुलै रोजी याप्रकरणी न्यायालयात तारीख होती. त्यामुळे अॅड. चक्रनारायण या अर्जकर्त्या अश्विनीचा पती राहुल पिणे याचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात हजर झाल्या होत्या. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्तीसोबत असलेल्या अश्विनीने चक्रनारायणच्या अंगावर चालून जाऊन शिवीगाळ केली होती.