लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी खुर्च्या नेहमीच 'अदृश्य वीजवाहक' असतात. त्या दिसायला साध्या, पण त्यावर बसायचा प्रश्न आला की ठिणग्या उडतातच. नागपूरमध्ये एका शासकीय कार्यक्रमात या ठिणग्यांनी अक्षरश 'स्पार्क' घेतला आणि रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, डाक विभागाच्या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये 'अधिकार' आणि 'खुर्ची'च्या वादावरून झालेला संघर्ष एवढा तापला की, थेट नेमप्लेट काढणे, साडीवर पाणी उडवणे आणि चिमटे घेणे इथपर्यंत गोष्ट पोहोचली. तेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत.
या प्रकाराचा व्हिडीओ नंतर समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. शिवाय डाक कार्यालयांतही दिवसभर याच प्रकाराची चर्चा दिसून आली. घटनेचा प्रसंग १७ व्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनावेळी घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होत असताना नागपूरच्या सभागृहात दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये 'ऑफलाइन' युद्ध पेटले. एका अधिकाऱ्याची दुसऱ्या राज्यात बदली झाली होती; पण त्यांनी न्यायालयातून त्या आदेशावर स्थगनादेश मिळवला. दरम्यान, त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांना प्रभार देण्यात आला होता. म्हणजेच स्टेजवर दोघीही स्वतःला 'मुख्य यजमान' समजत होत्या. त्यात समावेश होता पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे व प्रभारी असलेल्या सुचिता जोशी. हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच तणावाचे दडपण जाणवत होते. स्टेजवर तीन खुर्चा एक गडकरींसाठी आणि उरलेल्या दोघींच्या 'अधिकार युद्धा'साठी. प्रभारी अधिकाऱ्यांच्या नावाची नेमप्लेट ठेवली होती, पण बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी 'ही माझी खुर्ची!' म्हणत ती हटवली. उपस्थित सगळे पाहत असताना एकीने दुसरीच्या साडीवर पाणी उडवले, तर चिमटे काढून हुसकावण्याचाही प्रयत्न झाला.
मी त्यांना ओळखत नाही... हा आमचा अंतर्गत विषय!
बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी फक्त एवढेच म्हटले, 'मी त्यांना ओळखत नाही. त्या इथे का आल्या, ते माहीत नाही.' तर प्रभारी अधिकाऱ्यांनी शांतपणे उत्तर दिले, 'हा अंतर्गत विषय आहे.'
तक्रारीचा 'क्लायमॅक्स' लवकरच ?
प्रभारी अधिकारी आता कार्यक्रमाचा खर्च, उपस्थिती आणि संपूर्ण अहवाल तयार करत आहेत. सूत्रांनुसार त्या औपचारिक तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असून हे प्रकरण विभागीय पातळीवर चर्चेत येणार आहे. गडकरींसमोर झाल्याने या घटनेची 'डॅमेज रिपोर्ट' दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यताही व्यक्त्त होत आहे.
'संगीत खुर्ची'चा सरकारी एपिसोड
कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी मुख्य अतिथी म्हणून आले होते, त्यांच्या शेजारी बसण्यासाठी दोर्धीची झटापट पाहून अधिकारीवर्गसुद्धा थबकला, 'एकीचा आदेश स्टे, दुसरीचा प्रभार.. आणि खुर्ची एकः' इतक्या साध्या कारणावरून असा गंभीर प्रकार, गडकरी यांनी स्वतः हस्तक्षेप करत परिस्थिती सावरली. त्यांनी शांतपणे प्रभारी अधिकाऱ्याला आपल्या बाजूला बसवून घेतले आणि कार्यक्रम पुढे नेला अन् सभागृहातील 'अनोख्या नाट्यावरील पडदा तेव्हाच पडला. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र चर्चेची ठिणगी संपूर्ण विभागभर पसरली. 'हा अधिकारपदाचा स्त्री-हट्ट होता का अहंकाराचा खेळ?' असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होता. दोन्ही अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.
Web Summary : Two female postal officers fought over a chair at a Nagpur event attended by Minister Gadkari. The dispute escalated to removing nameplates and throwing water. A video went viral.
Web Summary : नागपुर में मंत्री गडकरी के कार्यक्रम में दो महिला डाक अधिकारियों ने कुर्सी के लिए लड़ाई की। विवाद नेमप्लेट हटाने और पानी फेंकने तक बढ़ गया। एक वीडियो वायरल हो गया।