महिलांनी क्रांतीसाठी एकजूट करण्याची गरज
By Admin | Updated: August 10, 2015 03:22 IST2015-08-10T03:22:47+5:302015-08-10T03:22:47+5:30
संस्कृतीच्या आरंभापासून महिलांची विचार प्रक्रिया संपवून त्यांना गुलाम करण्याचे काम पुरुष आणि समाजसत्तेने केले.

महिलांनी क्रांतीसाठी एकजूट करण्याची गरज
यशवंत मनोहर : गीता महाजन यांच्या ‘स्त्रियालिटी’चे प्रकाशन
नागपूर : संस्कृतीच्या आरंभापासून महिलांची विचार प्रक्रिया संपवून त्यांना गुलाम करण्याचे काम पुरुष आणि समाजसत्तेने केले. त्यामुळे यापुढील काळात महिलांनी क्रांतीसाठी एकजूट होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी रविवारी येथे केले.
संवेदना प्रकाशन खापरखेडा आणि प्रगतिशील लेखक संघ नागपूर जिल्हाच्या वतीने विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात गीता महाजन यांच्या ‘स्त्रियालिटी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर लेखिका गीता महाजन, सुनिता झाडे, प्रसेनजित गायकवाड, उषा मिश्रा उपस्थित होत्या. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, स्त्रियालिटी पुस्तक मुक्त चिंतन करणारे असून त्याच्या केंद्रस्थानी स्त्रिया आहेत. स्त्री जीवनाचा वर्तमान, इतिहास आणि त्यांच्या भवितव्याचा वेध घेण्याचा प्रयत्न पुस्तकातून झाला आहे. स्त्रियांना समाज सत्ता गुलाम करते. परंतू स्त्रियांची गुलामीला संमती असल्याशिवाय गुलामगिरी टिकत नाही. एखाद्याला गुलाम करण्यासाठी त्याच्या मन, विचार प्रक्रियेला संपवावे लागते. त्यामुळे आपण गुलाम आहोत याची जाणीव स्त्रियांना होण्यासाठी स्त्रियांनी गुलामगिरीची नेमकी व्याख्या करून क्रांतीसाठी एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी केले. उषा मिश्रा म्हणाल्या, गीता महाजन यांच्या पुस्तकातून भावी पिढीला प्रेरणा मिळणार आहे. पुस्तकात मांडलेले प्रसंग सर्व स्त्रिया भोगत असतात. परंतु त्या प्रतिकार न करता आपले अधिकार विसरत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसेनजित गायकवाड यांनी सर्व महिलांना दु:ख व्यक्त करण्यासाठी ऊर्जा बाळगण्याचे आवाहन केले. सुनिता झाडे म्हणाल्या, गीता महाजन यांचे व्यक्तिमत्त्व स्फूर्तिदायक असून त्यांना समाजिक कार्याची कळकळ आहे. पुस्तकातील वास्तव पांढरपेशा स्त्रियांना कळणार नाही. कार्यक्रमात उषा मिश्रा यांनी गीता महाजन यांना साची येथील बुद्ध स्तूप भेट दिला. पुस्तकाचे उत्कृष्ट मुखपृष्ठ केल्याबद्दल संगीता महाजन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संगीता महाजन यांनी केले. संचालन माधुरी सेलोकर यांनी केले. (प्रतिनिधी)